Join us  

ऑरेंज अलर्ट : पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात कोसळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 4:36 PM

मराठवाड्यासह राज्यात मुसळधाराची शक्यता

मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल

मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाने बुधवारी पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट दिला आहे. या दिवशी विभागातील जिल्हयांत मुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर मराठवाड्यासह राज्यांत बहुतांश ठिकाणी १८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस कोसळेल, अशीही शक्यता भारतीय हवामान शास्त्र विभागाने वर्तवली आहे.

मुंबईत पाऊस थांबून थांबून कोसळत असला तरी राज्यात बहुतांशी ठिकाणी राज्याची हजेरी लागत आहे. विशेषत: विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम असून, कोकणात देखील पाऊस विश्रांती घेत कोसळत आहे. मुंबईचा विचार करता सोमवारी सायंकाळी कोसळलेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली. मंगळवारी मुंबईत अवघ्या ६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत मुंबईत १०२.३८ टक्के एवढा पाऊस पडला आहे. पाऊस थांबत थांबत कोसळत असला तरी पडझड सुरुच आहे. दहिसर पूर्व येथील दहिसर पोलीस ठाण्याच्या मागे एका इमारतीच्या तिस-या मजल्यावरील छताच्या प्लास्टरचा भाग पडून जखमी झालेले राकेश वर्तक यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर आहे. उर्वरित २ ठिकाणी बांधकामाचा भाग कोसळला आहे. १ ठिकाणी झाड कोसळले. तर २ शॉर्ट सर्किट झाले. तर बुधवारसह गुरुवारी मुंबई शहर आणि उपनगरात आकाश सामान्य: ढगाळ राहील. हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असाही अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.   

टॅग्स :पाऊसमानसून स्पेशलमुंबई मान्सून अपडेटहवामान