विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 06:42 IST2025-11-01T06:41:42+5:302025-11-01T06:42:46+5:30
मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल.

विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'; निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
मुंबई : मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात शनिवारी विरोधी पक्ष मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढणार आहेत. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत.
दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल.
कोणाकोणाचा सहभाग ?
या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेसचे कोण नेते सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी होतील, एवढेच ते म्हणाले.
मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ वाजता प्रारंभ करून मोर्चा ४ पूर्वी संपवायचे नियोजन आहे. मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल.
निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका
राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मतदार याद्यांतील गोंधळ व बोगस मतदारांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत न्यायालयात जाणे, निवडणुकांवर बहिष्कार व निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणे या पर्यायावर चर्चा झाल्याचे मनसे सूत्रांनी सांगितले.