Join us  

"वजनदार ने हल्के को..."; नाव न घेता अमृता फडणवीसांचा मुख्यमंत्री ठाकरेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 11:14 AM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

मुंबई- बाबरी मशीद पाडण्यासाठी आपण अयोध्येत उपस्थित असल्याच्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बीकेसी मैदानात झालेल्या सभेत यांनी खिल्ली उडवली आहे. तुम्ही बाबरीवर चढण्याचा प्रयत्न केला असता, तर तुमच्या वजनाने ती खाली पडली असती, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच शिवसैनिकांनी बाबरी पाडली, त्यामुळे त्यांना अभिमान वाटतो, असे बाळासाहेब ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले होते, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

उद्धव ठाकरेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेतून प्रत्युत्तर दिलं. माझे वजन सध्या १०२ किलो आहे. बाबरी पाडायला गेलो होतो, तेव्हा १२८ किलो होते. त्यात लाजायचे काय, असा प्रश्न करतानाच तिथे एकही शिवसैनिक नव्हता म्हटल्यावर तुम्हाला इतकी का मिरची लागली?, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला उत्तर दिले. 

उद्धव ठाकरेंना सामान्य माणसाची भाषा कळत नाही, त्यांना एफएसआयची भाषा कळते. सामान्य माणसाचा एफएसआय १ असेल तर आज माझा २ आहे आणि बाबरी पाडताना तो २.५ होता, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीसांच्या या टीकेनंतर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील ट्विट करत निशाणा साधला आहे.

वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया...असं म्हणत अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. 

दरम्यान, उद्धव ठाकरेंचे भाषण सोनियाजींना खूश करण्यासाठीच होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल काँग्रेस बोलते तीच भाषा ते बोलले. मी हिंदुत्व हिंदुत्व करतोय पण बघा संघाला शिव्या दिल्या. मी तुमचाच आहे हे सोनियाजींना दाखवण्याठी ते बोलले, अशी टीका फडणवीस यांनी केली. आद्य सरसंघचालक डॉ.हेडगेवार हे स्वातंत्र्यसैनिक होते याची सरकार दरबारी नोंद आहे. जंगल सत्याग्रहातही ते होते, याची आठवण फडणवीस यांनी करून दिली. स्वातंत्र्याच्या लढ्यात संघ कुठे होता, असा सवाल उद्धव यांनी शनिवारी सभेत केला होता.

‘यांचे’ वर्क फ्रॉम जेल-

पहाटेच्या शपथविधी यशस्वी झाला नाही याचा मला आनंदच आहे. मात्र, तो यशस्वी झाला असता तरी माझ्या मंत्रिमंडळात सचिन वाझे नसता.. अनिल देशमुख आणि दाऊदचा साथीदार नसता. तशी वेळ आली असती तर सत्तेला लाथ मारली असती. पण, यांचे मात्र सध्या वर्क फ्रॉम जेल सुरू आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :उद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीसअमृता फडणवीसशिवसेनाभाजपा