Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा घोटाळ्यांची चौकशी CBIला दिल्यास...; देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारवर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 16:06 IST

तुकाराम सुपेकडे आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोनं सापडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

मुंबई:  राज्य परीक्षेचा आयुक्त तुकाराम सुपे याने मुलगी व जावयाकडे दिलेल्या बॅगा जप्त केल्या असून त्यात तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांची रोकड तसेच एकूण ४४ वेगवेगळ्या प्रकारचे दागिने असा जवळपास २ कोटी रुपयांहून अधिकचा ऐवज जप्त केला आहे. तपासात सापडलेल्या दागिन्यांचे मुल्यांकन सोनारांमार्फत करण्यात येत आहे

घरी दुसऱ्यांदा टाकलेल्या धाडीमध्ये २ कोटी रुपयांची रोकड, दागिने सापडले असून पोलिसांनी जप्त केले आहेत. तुकाराम सुपे याला पोलिसांनी पकडल्याचे समजल्यानंतर त्याच्या पत्नीने हा ऐवज मेव्हणाकडे दिला होता. पोलीस चौकशीत ही माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांनी १ कोटी ९८ लाख रुपयांची रोकड व दागिने जप्त केले आहेत. याअगोदर तुकाराम सुपे याच्या घरातून ८८ लाख रुपयांची रोकड, दागिने, ५ लाख ५० हजारांच्या ठेवी असा ९६ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला होता.

तुकाराम सुपेकडे आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोनं सापडल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे ८८ लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी २ कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्‍या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय याच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच ३ महिन्यात बाहेर काढले, असं देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे म्हटलं.

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. 

सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्‍या खर्‍या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्या या मागणीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे आता लक्ष लागले आहे. 

दरम्यान, आरोपीकडे पैशांच्या दोन बॅगा पैकी त्याचे मुलीकडे एक बॅग ठेवल्याची तसेच त्याचे जावयाने त्याच्या मित्राकडे आरोपीकडील दुसरी पैशांची बॅग ठेवल्याची माहिती मिळाल्याने आरोपीचा जावई नितीन पाटील व मुलगी कोमल पाटील यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली. त्यांच्या चर्होली येथील घरी ९७ हजार रुपये मिळाले. मात्र, दोन्ही बॅगा न मिळाल्याने अधिक चौकशीत नितीन पाटील याने त्याचा मित्र विपीन याच्या वाघोली येथील औरा कॉन्टी सोसायटीतील फ्लॅटची झडती घेतली. त्यात दोन्ही बॅगा व सोबत एक सुटकेश मिळाली. त्यातील पैशांची मोजदाद केली. त्यात १ कोटी ५८ लाख ३५ हजार १० रुपये इतकी रक्कम आढळली. बॅंगासोबत आढळलेल्या सुटकेस व एक बॅगमध्ये प्लॉस्टीकच्या पिशवीमध्ये दागिन्यांच्या ४४ डब्या आढळून आल्या.

टॅग्स :देवेंद्र फडणवीसमहाराष्ट्र विकास आघाडीभाजपाउद्धव ठाकरे