पाच ते सात मिनिटांमध्ये ‘ऑपरेशन ट्रॅफिक क्लीअर’; अपघातग्रस्त वाहन क्रेनद्वारे हटवून वाहतूक सुरळीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 10:15 IST2025-10-06T10:15:13+5:302025-10-06T10:15:37+5:30
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड तसेच महत्त्वाच्या ठिकाणी एक क्रेन फक्त अपघाती तसेच बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी तैनात असते.

पाच ते सात मिनिटांमध्ये ‘ऑपरेशन ट्रॅफिक क्लीअर’; अपघातग्रस्त वाहन क्रेनद्वारे हटवून वाहतूक सुरळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोस्टल रोडच्या बोगद्यात एखादा अपघात किंवा वाहन बंद पडल्यास ते वाहन हटवून पाच ते सात मिनिटांत वाहतूक सुरळीत करण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर असते. अशावेळी, संबंधित वाहन तत्काळ क्रेनद्वारे आपत्कालीन मार्गिकेवर वळविण्यात येते. त्यानंतर वाहतूक सुरळीत केली जाते.
वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कोस्टल रोड तसेच महत्त्वाच्या ठिकाणी एक क्रेन फक्त अपघाती तसेच बंद पडलेली वाहने हटवण्यासाठी तैनात असते. अपघाताचा अलर्ट मिळताच तत्काळ ती वाहने घटनास्थळी रवाना होतात. अशावेळी कोस्टल रोडच्या बोगद्यातून अशी वाहने हटवण्याचे आव्हान असते. मात्र, यासाठी सगळ्यात आधी वाहने आपत्कालीन मार्गिकेवर वळविण्यात येतात. तेथून अन्य यंत्रणांच्या मदतीने ही वाहने बाहेर काढण्यात येत आहे. वाहतूक पोलिसांच्या कारवाईमुळे चालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पुढे ही कारवाई अधिक तीव्र होणार आहे. त्यामुळे स्वत:सह इतरांच्या जीवाला धोका निर्माण होईल, अशा रीतीने वाहन चालवू नये, वाहतूक नियमांचे पालन करा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
अपघाताची कारणे...
कोस्टल रोडवरील अनेकदा वेगामुळे चालकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते. ओव्हरटेकच्या नादात अनेकदा वाहने एकमेकांवर धडकली आहेत.
दुसरीकडे, अनेक जण बस लेन तसेच आपत्कालीन मार्गिकेवरून वाहने नेत असल्याने त्याचाही फटका कोंडीत भर घालून अपघाताला निमंत्रण देत आहेत.
अपघातांना आळा घालण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. तरीही काही चालक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात.