‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 05:32 IST2025-05-15T05:30:11+5:302025-05-15T05:32:11+5:30
हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे अशी भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला कळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

‘ऑपरेशन सिंदूर’मधून लष्कराची ताकद कळली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याला उत्तर देताना दहशतवादी कुठेही लपले, तरी आम्ही सोडणार नाही, हे भारतीय सैन्याने पाकिस्तानला दाखवून दिले आहे. हम ना झुकेंगे, ना रुकेंगे, ना बिकेंगे, ना थकेंगे अशी भारतीय सेनेची ताकद ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जगाला कळाली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
तर, निरपराध लोकांचे बळी घेणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करून भारतीय सैन्याने सूड उगवला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’मधून त्यांच्या गोळीचे उत्तर आपल्या सैन्याने मिसाईलने दिले. देशभक्ती आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा प्रत्येकाच्या अंगात संचारली पाहिजे, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
भाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, सांस्कृतिक मंत्री व मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे, विधान परिषदेचे गटनेते आ. प्रवीण दरेकर, सैन्यदलातील निवृत्त अधिकारी सार्जंट सदानंद चिखले, सुभेदार सुभाष दरेकर, हवालदार शंकर कुंभार, नाईक विजय जगताप, पोपटराव दाते, शंकर कदम यांच्यासह मुंबईतील पदाधिकारी, आमदार, माजी आमदार, माजी नगरसेवक व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
‘सिंदूर’ युद्धापेक्षाही अधिक सुंदर झाले
पाकिस्तानशी झालेल्या तिन्ही युद्धांत लढलेले आणि आज वयाच्या नव्वदीत असलेले सार्जंट सदानंद चिखले हे यात्रेत सामील झाले होते. तिन्ही युद्धात भारत कधीही मागे हटला नाही. त्यावेळी आम्ही केलेल्या युद्धांपेक्षा ऑपरेशन सिंदूर हे अधिक सुंदर झाले, असे ते म्हणाले.
भारतीय सैन्याचे कौतुक
सैन्याच्या तिन्ही दलांनी ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून दहशतवाद्यांचे पाकिस्तानातील नऊ अड्डे उद्ध्वस्त केले. या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याचे कौतुक करण्यासाठी मुंबई भाजपतर्फे बुधवारी ऑगस्ट क्रांती मैदान ते गिरगाव चौपाटी येथील शहीद तुकाराम ओंबळे स्मृती स्मारकापर्यंत तिरंगा रॅली काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे बोलत होते.
‘तो’ अड्डा उद्ध्वस्त झाल्याने अधिक आनंद
मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी अजमल कसाबने प्रशिक्षण घेतलेला अड्डा उद्ध्वस्त केल्याचा सर्वांत जास्त आनंद झाला. मुंबईचे अपराधी दहशतवादी मसूद अजहर, दहशतवादी अबू जिंदाल मारले गेले. शहीद सैनिकांना मानवंदना देण्यासाठी व सैनिकांचा सन्मान करण्यासाठी ही तिरंगा यात्रा काढण्यात आली आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.