‘बेस्ट’ला केवळ ७१४ बसचा पुरवठा! गेल्या चार वर्षांत दिले होते ४,५०० बसचे कंत्राट
By सीमा महांगडे | Updated: November 4, 2025 15:01 IST2025-11-04T15:00:39+5:302025-11-04T15:01:13+5:30
सध्या भाडेतत्त्वावरील २,६८५ गाड्याच ताफ्यात

‘बेस्ट’ला केवळ ७१४ बसचा पुरवठा! गेल्या चार वर्षांत दिले होते ४,५०० बसचे कंत्राट
सीमा महांगडे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘बेस्ट’च्या ताफ्यात नुकत्याच भाडेतत्त्वावरील १५७ एसी इलेक्ट्रिक बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे भाडेतत्त्वावरील बसची संख्या दोन हजार ६८५ वर पोहोचली आहे. ‘बेस्ट’ने तीन वर्षांपूर्वी दिलेल्या दोन हजार १०० आणि गेल्यावर्षी दिलेल्या दोन हजार ४०० च्या बसच्या कंत्राटांपैकी आतापर्यंत केवळ ७१४ बसचा पुरवठा कंत्राटदाराने केला आहे. कंत्राटदाराकडून बसचा वेळेत पुरवठा होत नसल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ या कंत्राटदारांवर कारवाई न करता त्यांना पाठीशी घालत असल्याचा दावा बेस्ट प्रवासी संघटना करत आहेत.
मुंबईची ओळख आता जगातील प्रदूषित शहरांपैकी एक अशी होत आहे. त्यामुळे नागरिकांना विविध श्वसनविकारांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे राष्ट्रीय शुद्ध हवा अभियानांर्तगत इलेक्ट्रिक एसी दोन हजार १०० बस घेण्याचा निर्णय ‘बेस्ट’ने मे २०२२ मध्ये घेतला. व्यवस्थापनाने ईव्ही ट्रान्स कंपनीची निवड करून सर्व बस पुरविण्याचे काम त्यांना दिले. वार्षिक किमान ७० हजार किलोमीटरचे अंतर गृहीत धरून अनुदानासह प्रतिकिमी ४६ रुपये ८१ पैसे दराने, तर अनुदानाशिवाय प्रतिकिलोमीटर ५६.८१ रुपये दराने या बस पुरविल्या जाणार होत्या.
‘बेस्ट’ने तीन वर्षांपूर्वी करार करूनही फक्त १६ टक्के बस उपक्रमात दाखल झाल्या आहेत. कंत्राटी बसगाड्यांवर एवढी मेहरबानी करण्यापेक्षा तितक्याच स्वमालकीच्या बसगाड्या खरेदी केल्या असत्या, तर बस मार्ग बंद होणे, सेवा खंडित होणे आणि प्रवाशांना अर्धा-अर्धा तास थांबावे लागणे यांसारख्या समस्या निर्माण उद्भवल्या नसत्या. ‘बेस्ट’चे खासगीकरण करून, ती बंद पाडून उपक्रमाच्या जागा हडपण्याचा हा अत्यंत खालच्या स्तराचा कुटिल राजकीय डाव आहे.
-रूपेश शेलटकर, अध्यक्ष, आपली बेस्ट आपल्याचसाठी
भाडेतत्त्वावरील बसचे कंत्राटदार बसची संख्या
- ओलेक्ट्रा ४०
 - एसएमटीएटीपीएल ६६६
 - टाटा मोटर्स ३६८
 - मातेश्वरी ६२९
 - ईव्ही ट्रान्स (२१०० लॉट) ६६५
 - स्विच मोबालिटी डबल डेकर ५०
 - ईव्ही ट्रान्स (२४०० लॉट) ४९
 - मुंबादेवी मोबालिटी( पीएमआय) १२४
 - चलो प्रीमियम १३०
 
खरेदीचा प्रस्ताव मार्गी लावा
कंपनीने स्वीकृती पत्र दिल्यापासून पहिल्या सहा महिन्यांत २५ टक्के बस, नवव्या महिन्यापर्यंत आणखी २५ टक्के, तर १२ महिन्यांत म्हणजे २० मे २०२३ पर्यंत उर्वरित ५० टक्के बस पुरवायच्या होत्या; परंतु कंपनीने ६६५ बस पुरविल्या आहेत. या कंपनीवर कारवाई करण्याऐवजी ‘बेस्ट’ने फेब्रुवारी २०२४ मध्ये दोन हजार ४०० बस घेण्याचे दुसरे कंत्राट दिले. अवघ्या दोनच कंपन्यांनी प्रतिसाद दिला. त्यावेळी ‘बेस्ट’ने पूर्वीच्याच कंपनीलाच काम दिले; परंतु या ताफ्यातील केवळ ४९ बसचा पुरवठा तोपर्यंत होऊ शकला आहे. त्यामुळे बेस्टचे संबंधित अधिकारी, तसेच बस पुरविण्यास टाळाटाळ करणाऱ्या कंपनीवर कठोर कारवाई करावी. बस खरेदीचा प्रस्ताव तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी संघटनांकडून होत आहे.