उद्योगांतील फक्त १३ टक्के कामगारांच्या हाताला काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 03:15 AM2020-05-26T03:15:22+5:302020-05-26T03:15:33+5:30

राज्यातील उद्योगचक्राला गती देण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत.

 Only 13% of the workers in the industry work | उद्योगांतील फक्त १३ टक्के कामगारांच्या हाताला काम

उद्योगांतील फक्त १३ टक्के कामगारांच्या हाताला काम

Next

मुंबई : नॉन रेड झोनमधील उद्योगधंदे सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली असली तरी कामगार विभागाकडे नोंदणीकृत असलेल्या राज्यातील ३६ हजार ६२३ उद्योगधंद्यांपैकी जेमतेम ६ हजार २९१ उद्योग सुरू झाले आहेत. या छोट्या-मोठ्या कारखान्यांमध्ये कार्यरत असलेल्या २८ लाख ५४ हजार कामगारांपैकी ३ लाख ६८ हजार कामगार (१३ टक्के) कामावर रूजू झाल्याची माहिती हाती आली आहे.

राज्यातील उद्योगचक्राला गती देण्यासाठी सरकारकडून कसोशीने प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक अरिष्ट कोसळलेले उद्योजकही व्यवसाय पूर्वपदावर आणण्यासाठी धडपड करत आहेत. मात्र, कामगारांच्या तुटवड्यापासून ते उत्पादनांच्या विक्रीपर्यंत अनेक आघाड्यांवर उद्योजकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे निरीक्षण कामगार विभागातील अधिकाऱ्यांकडून नोंदविण्यात आले आहे.

उद्योग सुरू झाले असले तरी अनेक ठिकाणी कच्च्या मालाच्या पुरवठा साखळीत अडचणी आहेत. उत्पादन प्रक्रिया सुरू केली तरी तूर्त त्यासाठी ग्राहक मिळेलच याची शाश्वती अनेकांना नाही. त्यामुळे काम कसे सुरू करायचे, या चिंतेने अनेकांना ग्रासले आहे.
रासायनिक किंवा तत्सम धोकादायक कारखान्यांमध्ये काम करणारे बहुसंख्य कामगार हे परप्रांतातील आहेत. त्यापैकी अनेक जण आपापल्या गावी गेले आहेत. जे इथे आहेत त्यांनाही घराची ओढ लागली आहे.

काही स्थानिक कामगारांनाही कोरोनाच्या भीतीने ग्रासले आहे. त्यामुळे कारखान्यांमध्ये कामगारांचा तुटवडा निर्माण झाला आहे. याशिवाय उद्योगांना परवानगी देताना त्यांना कामगारांच्या आरोग्य विम्यापासून ते कारखान्यांच्या निर्जंतुकीकरणापर्यंतच्या अनेक अटी घालण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता करणेही जिकिरीचे असल्याचे उद्योजक सांगतात.

अत्यावश्यक सेवेतील कारखान्यांमधील उत्पादन प्रक्रियेत फारसे अडथळे येताना दिसत नाहीत. मात्र, लॉकडाउनचा कालावधी संपून जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात होत नाही तोपर्यंत उर्वरित उद्योगांना चालना मिळणे अवघड असल्याचे मत तज्ज्ञांनी नोंदवले.

Web Title:  Only 13% of the workers in the industry work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.