सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; असा करा अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 21:44 IST2025-07-22T21:42:53+5:302025-07-22T21:44:43+5:30
Ganeshotsav 2025: स्थानिक पोलिस, वाहतूक पोलिसांचे ‘ना-हरकत’ प्रमाणपत्रही मिळणं सुलभ होणार

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मंडपासाठी ऑनलाइन परवानगीची सुविधा; असा करा अर्ज
Ganeshotsav 2025: सगळ्यांचा आवडता 'श्रीगणेशोत्सव' महाराष्ट्र शासनाने यावर्षापासून 'महाराष्ट्राचा राज्य उत्सव' म्हणून घोषित केला आहे. मुंबईतील श्रीगणेशोत्सव उत्साहाने व पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांना लागणाऱ्या विविध परवानग्या एक खिडकी योजनेद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्याचे नियोजन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे. त्यासाठी सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ पासून बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर संगणकीय एक खिडकी पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
श्रीगणेशोत्सव साजरा करताना मुंबईतील हजारो सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळ हे सार्वजनिक किंवा खासगी जागेवर मंडप उभारतात. या सर्व श्रीगणेश मंडळांसाठी महानगरपालिकेने विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर अवघ्या काही मिनिटांत श्रीगणेश मंडळांचा मंडप परवानगीचा आणि नूतनीकरणाचा अर्ज भरला जाणार आहे. मंडळांनी संगणकीय प्रणालीद्वारे अर्ज भरल्यानंतर त्यांना स्थानिक पोलिस स्थानक, स्थानिक वाहतूक पोलिस यांच्याकडे ना-हरकत प्राप्त करण्यासाठी जाण्याची आवश्यकता नाही. ही सर्व प्रक्रिया महानगरपालिकेच्या विभाग स्तरावर सहायक आयुक्त व परिमंडळीय स्तरावरील उप आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली जाणार आहे. त्यामुळे मंडळांचा खूप वेळ वाचणार आहे.
असा करा ऑनलाइन अर्ज
मुंबईतील श्रीगणेश मंडळांना सर्व परवानग्या सुलभतेने मिळाव्यात यासाठी महानगरपालिकेने अतिशय सुटसुटीत पद्धतीने अर्ज सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळांकरिता मंडप उभारण्यासाठीचा ऑनलाइन अर्ज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या https://portal.mcgm.gov.in या संकेतस्थळावर सोमवार, दिनांक २१ जुलै २०२५ पासून एक खिडकी पद्धतीने उपलब्ध आहे. या संकेतस्थळावर ‘नागरिकांकरिता’ रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ येथे ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)’ या लिंकवर मंडप परवानगीसाठी अर्ज सादर करता येईल. मंडळांच्या सोयीसाठी महानगरपालिका प्रशासनाने ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे सुटसुटीत आणि सहज करता येईल अशी केली आहे.
खड्डा विरहित मंडप उभारणीवर भर द्यावा
रस्ते व पदपथावर खड्डा विरहित मंडप उभारणीकरिता प्रभावी तंत्र उपलब्ध आहे. या तंत्राचा उपयोग करून श्रीगणेशोत्सव मंडळांनी मंडप उभारावेत, असे बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून नम्र आवाहन करण्यात येत आहे. मंडप उभारताना खड्डा खणल्याचे आढळल्यास संबंधित मंडळांकडून रस्त्याच्या पुनर्बांधणीचा खर्च व दंड याकरिता प्रति खड्डा प्रमाणे रक्कम वसूल करण्यात येणार आहे.
पर्यावरणपूरक मूर्ती, नैसर्गिक साहित्यावर भर
श्रीगणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा, यासाठी महानगरपालिकेने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. सर्व मंडळांनी पर्यावरणस्नेही श्रीगणेश मूर्ती स्थापना करावी. मूर्तीची सजावट व देखावे साकारताना पर्यावरणपूरक व नैसर्गिक साहित्याचा वापर करावा, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात येत आहे. यंदाचा श्रीगणेशोत्सव बुधवार, दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी श्रीगणेशाची मूर्ती स्थापनेपासून सुरू होत आहे. हा उत्सव अधिकाधिक जनताभिमुख व पर्यावरणपूरक व्हावा, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेडून मूर्तिकारांना आतापर्यंत ९०७ टन इतकी शाडू माती मोफत वाटप करण्यात आली आहे. तसेच, मूर्ती घडविण्यासाठी ९७९ मूर्तिकारांना तात्पुरत्या स्वरुपात मंडपांसाठी मोफत जागाही देण्यात आली.
मुंबईत विक्रीसाठी येणाऱ्या श्रीगणेशमूर्ती या कोकणातून देखील येतात. त्यामुळे कोकणात जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्ती घडवाव्यात यासाठी तेथील मूर्तिकारांना शाडू मातीसह इतर सुविधा पुरवाव्यात, यासाठी कोकण विभागीय आयुक्तांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने पत्रव्यवहार केला आहे. महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सर्व श्रीगणेशोत्सव मंडळे, श्रीगणेशभक्त, नागरिक सहकार्य करतील, याचा प्रशासनाला विश्वास आहे.