मुंबई : दरवर्षी गणेशोत्सवात केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून गणेशोत्सवाची सुट्टी रद्द करण्याचा , विद्यार्थ्यांची परीक्षा आयोजित करण्याचा घाट घातला जातो. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालये, शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. मात्र अशा परिस्थितीतही पुन्हा केंद्रीय मंडळाच्या शाळांकडून दरवर्षीचेच पाठ गिरविले जात असून विद्यार्थ्यांच्या परीक्षा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामुळे पालकांमध्ये नाराजी पसरली असून, संबंधित केंद्रीय व कॉन्व्हेंट शाळांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. याविरोधात आता युवा सेनेने शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे धाव घेतली आहे.यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना तर सोइ सुविधांच्या अभावी ऑनलाईन तासिकाना उपस्थित राहणे ही अवघड झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक चाकरमानी गणपतीच्या निमित्ताने आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावांकडे निघाले आहेत. या परिस्थितीत काही कॉन्व्हेंट शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन सत्र परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबईच्या परेल येथील सेंट पॉल हायस्कुलने १९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान ५ वि ते १० वी च्या परीक्षांचे नियोजन केल्याचा असाच प्रकार समोर आला आहे. कोरोना काळात जिथे विद्यार्थी ऑनलाईन तासिकांसाठीच उपलब्ध हजरहोऊ शकत नाहीत. तिथे ऐन गणेशोत्सवात परीक्षा आयोजित करून विद्यार्थ्यांचे नुकसान करण्याचा घाट शाळा घालत असल्याचा आरोप पालक करत आहेत. शाळेच्याया निर्णयाला विरोध म्हणून त्यांनी विद्यार्थी संघटनेकडे धाव घेतली आहे.शाळांना किती सुट्टी द्यायची याची मुभा शाळांना असली तरी विद्यार्थी व पालकांचा विचार त्यांनी करायला हवा. तसेच या कालावधीत तर परीक्षा तर घ्यायलाच नकोत. विद्यार्थी पालकांची आर्थिक व मानसिक दोन्ही परिस्थिती समजून न घेणाऱ्या अशा शाळांविरोधात शिक्षण विभागाने कडक कारवाई करावी, जेणेकरून या शाळा पुढच्या वेळी विद्यार्थी आणि पालकांना असा मन:स्ताप देणार नाहीत, अशी मागणी विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रदीप सावंत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी आपले निवेदन आवश्यक कार्यवाहीसाठी उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी पालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनाही पाठविले आहे.