ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण व्यवस्थापनाचे ज्ञान असलेले शिक्षक आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 17:16 IST2020-05-29T17:16:17+5:302020-05-29T17:16:40+5:30
अंतर्गत गुणांवर "शालेय व्यवस्थापन पदविका" चा निकाल घोषित करावा

ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण व्यवस्थापनाचे ज्ञान असलेले शिक्षक आवश्यक
मुंबई : राज्यातील माध्यमिक शाळा प्रमुखांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाची गरज भागविण्याच्या दृष्टिने विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विद्याशाखेचा 'शालेय व्यवस्थापन पदविका शिक्षणक्रम' तयार करण्यात आला आहे. आता ह्या शिक्षणक्रमाला शासनाची मान्यता व होऊ घातलेल्या मुख्याध्यापकांसाठी अनिवार्यता प्राप्त झाल्याने अनेक शिक्षक या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. मात्र डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (शालेय व्यवस्थापन पदविका) च्या परीक्षा या मे या असतात. यंदा त्या होणे शक्य नसल्याने त्याचा निकाल अंतर्गत गुणांच्या आधारे घोषित करावा अशी मागणी शिक्षक आणि संघटना यांकडून होत आहे. भाजपा शिक्षक आघाडीने यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूंना पत्र लिहून ही मागणी केली आहे.
शाळेचे व्यवस्थापन सुरळीत चालविण्यासाठी व्यवस्थापनाचे शास्त्र अवगत करावे लागते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाने याचा विचार करून १९९३ साली हा अभ्यासक्रम चालू केला. या अभ्यासक्रमात शैक्षणिक व्यवस्थापन, कार्यालयीन व्यवस्थापन, शालेय आर्थिक व्यवस्थापन, शाळेची रचना व भौतिक सुविधा, विद्यार्थी गुणवत्ता विकास व कृतीसंशोधन आराखडा असे विषय शिकविले जातात. व अंतर्गत कामांसाठी गुण दिले जातात. मे महिन्यात या अभ्यासक्रमाची परीक्षा राज्यातील विविध केंद्रांवर होत असते. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव व लॉकडाऊन असल्याने परीक्षा होतील की नाही याबाबत साशंकता आहे त्यातच जून महिन्यापासून शिक्षकांना शाळेची कामे करावी लागतील त्यामुळे अंतर्गत गुणांच्या आधारे अभ्यासक्रमाचा निकाल घोषित करावा अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. वर्षभर या अभ्यासक्रमाचा अभ्यास शिक्षकांनी केला आहे तसेच अंतर्गत कामे केली असल्याने परीक्षांचे आयोजन करणे विद्यापीठाला शक्य नसल्यास अंतर्गत गुणांच्या आधारे निकाल घोषित करावा अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.
शाळा प्रशासन चालविताना मुख्याध्यापकांना, शिक्षकांना विद्यार्थी, शिक्षक, पालक व शिक्षण विभागामध्ये समन्वय साधणे गरजेचे असते. यासाठी मुख्याध्यापकांना शालेय व्यवस्थापन पदविका हा अभ्यासक्रम सहाय्यभूत ठरेल. शाळेची गुणवत्ता वाढविण्यासाठी मुख्याध्यापकांनी शिक्षकांनी अपडेट राहणे आवश्यक आहे यासाठी त्यांना हा अभ्याक्रम उपयुक्त ठरतो. आता तर ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या दृष्टीने त्यात बदल होऊन हा अभ्यासक्रम अपडेट होणे आवश्यक आहेच मात्र तो पूर्ण केलेले शिक्षकही सेवेत अत्यावश्यक असल्याचे निरीक्षण काही शिक्षकांनी नोंदविले आहे. त्यामुळे याचा विचार करत शासनाने आधी यंदाच्या परिक्षर्थींना पास करावे अशी मागणी केली आहे.