माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत १४ जानेवारी २०२४ ला शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला होता. यावेळी शिंदे यांनी त्यांना भगवा झेंडाही भेट दिला होता. शिवसेनेत प्रवेश करून आज मिलिंद देवरा यांना एक वर्ष पूर्ण झाले. त्याबद्दल त्यांनी एका विशेष संदेशातून आपल्या भावना व्यक्त केल्या.
काय आहे मिलिंद देवरा यांचा खास संदेश
मिलिंद देवरा म्हणाले, "मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. हा सण नव्या सुरुवातीचा आणि परिवर्तनाचा प्रतीक मानला जातो. हा सण माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे कारण बरोबर एक वर्षापूर्वी मी ह्याच दिवशी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश करण्याचा भावनिक निर्णय घेतला होता. हा निर्णय घेणे माझ्यासाठी सोपे नव्हते, कारण काँग्रेस पक्षाशी अनेक दशके माझेच नव्हे तर माझ्या परिवाराचे देखील नाते होते. पण मला जाणवले की काँग्रेस दिशाहीन पक्ष झाला आहे. जेव्हा २०१९ मध्ये आपल्या तत्त्वांशी तडजोड करत काँग्रेसमधील नेत्यांनी महाविकास आघाडीची स्थापना केली, त्यावेळी हे अधिक स्पष्ट झाले. महाविकास आघाडीची विचारसरणीतील विसंगती आणि शासकीय कामांमधील दुर्लक्ष मला वेगळा मार्ग निवडण्यास प्रवृत्त करणारे ठरले."
काँग्रेसमधून बाहेर पडताना शिवसेनेचीच निवड का?
"शिवसेनेत प्रवेश करणे हा एक राजकीय निर्णय नसून एक भावनिक निर्णय होता. माझे वडील स्व. मुरलीभाई देवरा यांचे आणि बाळासाहेब ठाकरेंचे मैत्रीचे नाते होते. बाळासाहेबांनी दिलेला आदर आणि त्यांनी आमच्या परिवारावर केलेले प्रेम, नेहमीच माझ्या सोबत राहिले आहे. गेल्या एका वर्षात, महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी सुद्धा मला तितक्याच प्रेमाने स्वीकारले आहे. मी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय घेतला याचे कारण त्यांच्या नेतृत्वाची स्पष्टता आणि ठामपणा मला आवडला. शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पहिल्या वर्षात मला डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रचंड मदत मिळाली. त्यांनी मला लहान भावाप्रमाणे मार्गदर्शन केले आणि पक्षात माझं स्थान बळकट केलं. २७ व्या वर्षी डॉ. श्रीकांत आणि मी संसदेत प्रवेश केला होता. आमच्यात या साम्यामुळे एकमेकांना मदत करण्याचा ऋणानुबंध अधिक दृढ झाला आहे," अशा शब्दांत त्यांनी शिंदे पिता-पुत्रांची स्तुती केली.
मुख्यमंत्री फडणवीसांचीही प्रशंसा
"मुंबई आणि महाराष्ट्राला महायुती सरकारच्या नेतृत्वाखाली दूरदृष्टीपूर्ण विकास लाभला आहे. २०१४ मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर सुरु झालेले परिवर्तनाचे पर्व एकनाथ शिंदे यांनी पुढे नेले. आता, देवेंद्रजी आणि एकनाथजी एकत्र काम करत असताना, मुंबईकर आणि महाराष्ट्रातील लोकांच्या अपेक्षा नक्कीच पूर्ण होतील, याची मला खात्री आहे. २०२४ च्या अखेरीस, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्यासाठी एक मोठी वैयक्तिक हानी झाली. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन झाले. ते केवळ माझ्या वडिलांचे जवळचे मित्र नव्हते, तर माझे मार्गदर्शकही होते. त्यांच्या धोरणांनी देशाला आर्थिक प्रगतीच्या दिशेने नेले. माझ्या आयुष्यातील आणि राजकीय प्रवासातील या नवीन अध्यायासाठी मी सर्व शुभचिंतकांचे आणि समर्थकांचे आभार मानतो. तुमचा पाठिंबा माझ्यासाठी प्रेरणादायक आहे," असे देवरा म्हणाले.
मकरसंक्रांती हा नवीन सुरुवातीचा सण आहे आणि मला भविष्याबाबत खूप उत्सुकता आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपण महाराष्ट्र आणि भारतासाठी उज्ज्वल भविष्य निर्माण करु, असा विश्वास त्यांनी निर्माण केला.