‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती; ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 10:21 IST2023-06-10T10:20:21+5:302023-06-10T10:21:13+5:30
देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विस्तारा कंपनीने विस्तार करण्याची योजना हाती घेतली आहे.

‘विस्तारा’त होणार एक हजार नोकरभरती; ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: देशांतर्गत विमानसेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या विस्तारा कंपनीने विस्तार करण्याची योजना हाती घेतली असून, कंपनीच्या ताफ्यात लवकरच १० नवीन विमाने दाखल होणार आहेत. तसेच कंपनीतर्फे एक हजार नव्या कर्मचाऱ्यांचीदेखील भरती करण्यात येणार आहे. येत्या काही काळामध्ये कंपनीचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण होणार आहे. त्यापूर्वीच कंपनीने स्वतःचा ताफा अधिक सक्षम करण्यावर भर दिला आहे.
उपलब्ध माहितीनुसार, चालू आर्थिक वर्षात ही १० नवीन विमाने कंपनीच्या ताफ्यात दाखल होणार असून यांपैकी एक विमान नुकतेच कंपनीला प्राप्त झाले आहे. या १० विमानांसाठी कंपनीला मोठ्या प्रमाणावर नव्या कर्मचाऱ्यांची आवश्यकता असून, त्याच अनुषंगाने कंपनीने या नव्या एक हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचा निर्णय घेतला आहे. यामध्ये प्रामुख्याने वैमानिक व अन्य विभागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. आर्थिक गर्तेत अडकल्यामुळे सध्या जमिनीवर असलेल्या गो-फर्स्ट कंपनीच्या ५० वैमानिकांना कंपनीने नियुक्त केले आहे. तर केबिन कर्मचाऱ्यांमध्ये नव्या मुलांना संधी देण्याचाही कंपनीचा मानस आहे.