मुंबईकरांना हवाय एक महिन्यांचा लॉकडाऊन ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2020 18:03 IST2020-06-16T18:02:46+5:302020-06-16T18:03:21+5:30
लोकल सर्कलच्या सर्वेक्षण अहवालातील निरीक्षण; देशातील कोरोना प्रभावित क्षेत्रांमध्ये भीती कायम

मुंबईकरांना हवाय एक महिन्यांचा लॉकडाऊन ?
मुंबई : कोरोनाचा प्रकोप रोखण्यासाठी लागू झालेल्या लॉकडाऊनची जबर किंमत देशाच्या अर्थव्यवस्थेला मोजावी लागली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाही केवळ अर्थचक्राला गती देण्यासाठी अनलाँकचे टप्पे सुरू झाले. मात्र, त्यानंतरही कोरोनाच्या विळख्यातील प्रमुख शहरांमध्ये भीतीचे सावट कायम आहे. या शहरांतील ७४ टक्के लोकांनी आणखी एक महिना लॉकडाऊनची निकड व्यक्त केली आहे. तर, मुंबईत या वाढिव लॉकडाऊनचे समर्थन करणा-यांची संख्या ६४ टक्के आहे.
सोशल मीडीया प्लॅटफाँर्मवर विविध विषयांवरील सर्वेक्षण करणारी देशातील अग्रगण्य संस्था ‘लोकल सर्कल’च्या अहवालातून ही माहिती हाती आली आहे. मुंबई, दिल्ली आणि चेन्नई या शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत असून या भागांतील कोरोना बळींची संख्याही वाढू लागली आहे. त्यामुळेच कोरोनाला रोखण्यासाठी चेन्नईने १९ ते ३० जून या कालावधीत पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केले आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असलेल्या शहरांमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याची शिफारस केंद्र सरकारकडूनही केली जात आहे. मात्र, चेन्नई वगळता अन्य ठिकाणी लॉकडाऊन लागू होईल असे वातावरण तूर्त दिसत नाही. या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना सर्वाधिक प्रभाव असलेल्या १३ शहरांमध्ये लोकल सर्कलने एक सर्वेक्षण केले. त्यात सुमारे ३० हजार लोकांनी आपली मते नोंदवली आहेत. यापैकी २२ टक्के लोकांना पुन्हा लॉकडाऊन नको अशी भूमिका मांडली आहे. तर, ४ टक्के लोकांनी आपले मत व्यक्त केलेले नाही.
औरंगाबादला सर्वाधिक भीती
सर्वेक्षण केलेल्या १३ शहरांपैकी एक महिन्याचा लॉकडाऊन वाढवावा असे मत ८० टक्के औरंगाबादकरांनी व्यक्त केले आहे. त्याखालोखाल दिल्ली (७९), जोधपूर (७४), अहमदाबाद (७३), इंदोर (६७), मुंबई (६४), चेन्नई (६१), , पुणे (६०), गुरूग्राम (५९), जयपूर (५३), सुरत (५७), कोलकत्ता (५२) आणि ठाणे या शहरांचा क्रमांक लागतो. या सर्वेक्षणात मुंबईतल्या साडे पाच हजार लोकांनी आपले मतप्रदर्शन केले आहे. ३४ टक्के लोकांना लॉकडाऊन नको अशी भूमिका मांडली आहे. तर, पाच टक्के लोकांनी आपले मत व्यक्त केलेले नाही.
राज्यकर्ते अनुकूल नाहीत
केंद्राकडून लॉकडाऊनची शिफारस केली जात असली तरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा लाँकडाऊन करण्याची शक्यता फेटाळून लावली आहे. दैनंदिन व्यवहार पूर्वपदावर आणण्याच्या प्रयत्नांमध्ये जर नियमांचे उल्लंघन झाले तर पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल असा इशारा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरवातीला दिला होता. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन होणार नाही अशी भूमिका राज्य सरकारकडून मांडली जात आहे.