Join us

एक लाख डीसीपींना,  एक लाख मला; एफआरआय रद्दसाठी पीआयने घेतले २ लाख 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2022 13:18 IST

तक्रारदार व्यावसायिकाचे नाव राकेश शाह असून ते इन्शुरन्स कन्सल्टंट आहेत. हा प्रकार २०२० मधील आहे. जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी काम बंद असल्याने शाह हे त्यांच्या तीन मित्रांसोबत स्वतःच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले.

मुंबई : डीसीपी चांगल्या मूडमध्ये आहेत. पण, त्यांनी १ लाख मागितलेत आणि १ लाख मला व माझ्या स्टाफला मॅटर सेटलमेंट करायला, असे सांगत २ लाखांची खंडणी उकळल्याचा आरोप अंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राधेश्याम शर्मा यांच्यावर व्यावसायिकाकडून करण्यात आला आहे. त्यांनी तसे पत्र पोलीस आयुक्त संजय पांडे यांना दिले आहे.तक्रारदार व्यावसायिकाचे नाव राकेश शाह असून ते इन्शुरन्स कन्सल्टंट आहेत. हा प्रकार २०२० मधील आहे. जेव्हा लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी काम बंद असल्याने शाह हे त्यांच्या तीन मित्रांसोबत स्वतःच्या ऑफिसमध्ये भेटायला गेले. एकत्र जेवण घेतल्यावर त्यांनी टाईमपाससाठी रमी खेळण्यास सुरुवात केली. त्याचवेळी शर्मा त्याठिकाणी आला आणि त्याने शाह यांच्यावर कोरोनाचे नियम मोडत जुगार खेळत असल्याचा आरोप केला. याबाबत पोलीस नियंत्रण कक्षावर फोन आल्याचेही त्याने सांगितले. मात्र त्यांना चुकीची माहिती मिळाल्याचे सांगत शाह यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलीस उपायुक्त परिमंडळ ९ यांच्याशी बोलतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर डीसीपी चांगल्या मूडमध्ये होते. मात्र, त्यांनी एक लाख मागितले आहेत. तसेच मला व स्टाफला एक लाख द्या आणि आम्ही प्रकरण मिटवतो, असे सांगितले. त्यावर घाबरलेल्या शाह व मित्रांनी जमवून त्याला २ लाख दिले. या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे सांगण्यात आले.

‘तक्रार करण्याची हिंमत नव्हती’ -पोलिसांविरोधात तक्रार करण्याची हिंमत नव्हती. पण, नवीन पोलीस आयुक्त पांडे हे नियुक्त झाल्यावर अंगडिया प्रकरण बाहेर आले. ज्यात पोलीस उपायुक्तावरही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मी पाहिले आणि माझ्यात हिंमत आली, असे शाह यांनी पत्रात म्हटले आहे. हा प्रकार २ जून, २०२० रोजी घडला असून तुम्ही शर्मा याचे मोबाइल लोकेशन तसेच स्टेशन डायरी तपासलात तर सगळ्या गोष्टी उघड होतील, असा दावादेखील शाह यांनी पत्रात केला आहे. हे पैसे आमच्या मेहनतीचे होते. त्यामुळे याप्रकरणी न्याय मिळेल, अशी अपेक्षा शाह यानी केली आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीपोलिस