एक लाख मुंबईकर घेताहेत उच्च रक्तदाबावर उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2025 04:32 IST2025-05-17T04:32:09+5:302025-05-17T04:32:44+5:30

पालिका रुग्णालयातील स्थिती;  उच्च रक्तदाब दिनानिमित्त ‘जागर’ 

one lakh mumbaikars are undergoing treatment for high blood pressure | एक लाख मुंबईकर घेताहेत उच्च रक्तदाबावर उपचार

एक लाख मुंबईकर घेताहेत उच्च रक्तदाबावर उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ‘सायलेंट किलर’ म्हणून ओळखला जाणारा उच्च रक्तदाबाचा आजार शरीराला हळूहळू हानी पोहोचवितो. परंतु, योग्य उपचार आणि जीवनशैलीत बदल केल्यास त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्यामुळे १७ मे रोजी असलेल्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे औचित्य साधून महापालिकेने मे महिन्यात मीठ व साखर जनजागृती अभियान हाती घेतले आणि मुंबईकरांना हेल्दी खा, स्वस्थ राहा, मस्त राहा असा संदेश दिला. यानिमित्ताने महापालिकेच्या विविध दवाखाने आणि रुग्णालयांत सध्याच्या घडीला १ लाख १६ हजार रुग्ण उपचार घेत असल्याची माहितीही समोर आली आहे.

यंदाच्या जागतिक उच्च रक्तदाब दिनाचे घोषवाक्य ‘रक्तदाब अचूक मोजा, नियंत्रणात ठेवा आणि दीर्घायू व्हा’ असे निश्चित केले आहे. महापालिकेद्वारे शहरात २०२३ पासून आजपर्यंत ३० वर्षांवरील २५ लाख व्यक्तींचे उच्च रक्तदाबासाठी सर्वेक्षण केले आहे. त्यापैकी १ लाख ४० हजार जणांमध्ये उच्च रक्तदाब आढळून आला आहे. तसेच २०२२ पासून सुरू केलेल्या २५ तपासणी केंद्रांत ४ लाख ९२ हजार रुग्णांची उच्च रक्तदाबाची तपासणी करण्यात आली आहे.

उच्च रक्तदाबामुळे पक्षाघात, हृदयविकार, किडनीचे आजार, नेत्र विकार याचा धोका उद्भवू शकतो. प्रतिदिन पाच ग्रॅमपेक्षा जास्त मीठ खाल्ल्यास आरोग्य धोक्यात येते, असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेकडून दिला जातो. मात्र, असे असतानाही २०२१ मधील सर्वेक्षणात मुंबईकर प्रतिदिन नऊ ग्रॅम मिठाचे सेवन करीत असल्याचे समोर आले आहे. 

कमी मीठ, कमी साखरेच्या सवयी लावा

विविध देशात केलेल्या संशोधनाद्वारे असे आढळून आले की, लहान वयात मिठाचा वापर कमी केल्याने तरुण वयात उच्च रक्तदाब व हृदयविकार, आदी आजार होण्याचा धोका कमी करता येतो. त्यामुळे मीठ व साखरेचे सेवन कमी प्रमाणात सेवन करण्याची सवय लावण्याच्या दृष्टीने आता महापालिकेने कंबर कसली आहे. त्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अभियानात पदार्थांचे आवरण  वाचून आहार निवडीस प्रवृत्त करणे, तसेच प्रक्रियायुक्त अन्नपदार्थांचे मर्यादित सेवन करण्यासाठी जागरूकता वाढविणे, ही उद्दिष्टेही ठेवण्यात आली आहेत.

 

Web Title: one lakh mumbaikars are undergoing treatment for high blood pressure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य