मेट्रो मार्गिकेचा संरक्षक कठडा कोसळून एक ठार; मुलुंडमधील घटना; दुर्घटनेत तीन जखमी, एकाला उपचारानंतर घरी सोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 04:58 IST2026-02-15T04:58:08+5:302026-02-15T04:58:41+5:30

मृतासह दोन जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. हे त्यांच्याच रिक्षाने प्रवास करत होते. कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नानिमित्ताने खरेदीसाठी ते जात होते.

One killed as guardrail of metro line collapses; Incident in Mulund; Three injured in accident, one discharged after treatment | मेट्रो मार्गिकेचा संरक्षक कठडा कोसळून एक ठार; मुलुंडमधील घटना; दुर्घटनेत तीन जखमी, एकाला उपचारानंतर घरी सोडले

मेट्रो मार्गिकेचा संरक्षक कठडा कोसळून एक ठार; मुलुंडमधील घटना; दुर्घटनेत तीन जखमी, एकाला उपचारानंतर घरी सोडले

मुंबई :मेट्रो प्रकल्पाच्या कामातील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आहे. मुलुंड (पश्चिम) येथील एलबीएस मार्गावर शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास  मेट्रोच्या उड्डाणपुलाचा सुमारे ६ फूट बाय ४ फूट आकाराचा सिमेंटचा संरक्षक कठडा (पॅरापेट वॉल) खालून जात असलेल्या वाहनांवर कोसळला. या अपघातात रामधन यादव या व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अन्य तीन प्रवासी गंभीर जखमी झाले.

मृतासह दोन जखमी व्यक्ती एकाच कुटुंबातील आहेत. हे त्यांच्याच रिक्षाने प्रवास करत होते. कुटुंबातील एका सदस्याच्या लग्नानिमित्ताने खरेदीसाठी ते जात होते. त्यावेळी जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या परिसरात ही घटना घडली. वर्दळीच्या लाल बहादूर शास्त्री मार्गावर घाटकोपर-ठाणे-कासारवडवली या ‘मेट्रो ४’च्या उन्नत मार्गाचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना सिमेंटच्या भिंतीचा एक मोठा तुकडा अचानक निखळला आणि खालून जाणाऱ्या एका रिक्षावर आणि खासगी स्कोडा कारवर कोसळला. हा आघात इतका मोठा होता की, रिक्षाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला, तर कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने मदतकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना जवळच्याच उपासनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात रामधन यादव यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच डॉक्टरांनी मृत घोषित केले.

जखमींपैकी ४५ वर्षीय राजकुमार इंद्रजीत यादव यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अन्य दोन जखमींमध्ये ५२ वर्षीय महेंद्र प्रताप यादव आणि ४० वर्षीय दीपा रुहिया यांचा समावेश आहे. यात दीपा यांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून इतर जखमींची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. बांधकामाचा काही भाग स्कोडा कारवरही कोसळला. त्यात कारमधील प्रवासीही जखमी झाले होते.

मृताच्या वारसदारांना  पाच लाख : मुख्यमंत्री

मुलुंड भागात मेट्रो बांधकामाचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून, या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. मृताच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत राज्य सरकार देणार आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार करणार आहे. दरम्यान, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना फडणवीस यांनी केली आहे.

पाच जणांना अटक

मुलुंड येथील दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर हरीश चौहान, प्रोजेक्ट मॅनेजर कुलदीप सापकाळ, डेप्युटी मॅनेजर सौरभ सिंग, सुपरवायझर प्रशांत भोईर, प्रोजेक्ट मॅनेजर अवधूत इनामदार यांचा समावेश आहे. यातील इनामदार हा डीबी हिल या देखरेख करणारा कंपनीशी तर उर्वरित चौघे हे मिलन रोड बिल्ड टेक कंपनीशी संबंधित आहेत.

सदोष मनुष्यवधाचा कंत्राटदारावर गुन्हा

दुर्घटनेप्रकरणी मुलुंड पोलिसांनी कंत्राटदार मिलन रोड बिल्डटेक कंपनीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपआयुक्त हेमराज राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, सदोष मनुष्यवध, सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न तसेच आर्थिक नुकसानीसंबंधी विविध कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ते म्हणाले की, मेट्रो प्रकल्पाच्या निकृष्ट कामाबाबत नागरिक व विविध संस्थांकडून आलेल्या तक्रारींचीही चौकशी केली जाणार असून दोषींवर कारवाई केली जाईल. मुलुंड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय जोशी यांनीही या दुर्घटनेस नेमके कोण जबाबदार आहे याचा सखोल तपास सुरू असल्याचे नमूद केले.

Web Title : मुलुंड में मेट्रो का पैरापेट गिरने से एक की मौत, तीन घायल।

Web Summary : मुलुंड में मेट्रो निर्माण हादसे में पैरापेट गिरने से एक की मौत हो गई और तीन घायल हो गए। लापरवाही का मामला दर्ज; राज्य सरकार ने मुआवजे और जांच की घोषणा की। पांच गिरफ्तार।

Web Title : Metro parapet collapse in Mulund kills one, injures three.

Web Summary : A metro construction accident in Mulund killed one and injured three when a parapet wall collapsed. Negligence charges filed; state announces compensation and investigation. Five arrested.

टॅग्स :Metroमेट्रो