मुंबई : गावदेवीमध्ये हिट अँड रन प्रकरणामध्ये रस्त्यावर झोपलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलिसांनी शुक्रवारी मर्सिडीज चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. जगदीश ऊर्फ जग्गू, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सफाई कामगार पार्वती कलियन (३९) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. जग्गू हा पालिका कर्मचाऱ्यांना साफसफाईच्या कामात मदत करायचा. ३१ जुलै रोजी सायंकाळी पावणेसात ते ७च्यादरम्यान बाबुलनाथ चौकीजवळील ओरिएंटल क्लबच्या मागील गेटबाहेर झोपलेला असताना जग्गूच्या अंगावरून भरधाव मर्सिडीज नेली. त्यानंतर चालक कुठलीही वैद्यकीय मदत न करता तेथून पसार झाला.
स्थानिकांनी जगदीशला नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. गावदेवी पोलिसांनी चालक कमलेश याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.