Join us

एका मेट्रो स्टेशनवर एक कोटींची ‘चिन्हे’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2020 18:39 IST

Mumbai Metro : मेट्रो २ अ आणि सातसाठी २९ कोटींचे अंदाजपत्रक

साईनेज आणि गाफिक्सचे काम लवकरच होणार सुरू

मुंबई :  पुढील वर्षभरात मेट्रो दोन अ आणि सात या मार्गावरील मेट्रो प्रवास सुरू करण्याची लगबग सुरू झाली असून इथल्या ३० स्टेशन्सवरील सुरक्षा आणि मार्गदर्शक सूचनांचे चिन्हांकित फलक लावण्यासाठी सुमारे २९ कोटींपेक्षा जास्त रक्कम खर्च केली जाणार असल्याची माहिती हाती आली आहे. या फलकांसाठी आवश्यक असलेले ग्राफिक्स एमएमआरडीएने यापूर्वीच तयार केलेले आहेत.

दहिसर डी. एन. नगर या मेट्रो दोन मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले असून जानेवारी महिन्यापासून या मार्गिकेवर ट्रायल रन सुरू करण्याचे आणि मे महिन्यापासून प्रत्यक्ष सेवा सुरू होईल असे संकेत एमएमआरडीएने दिले आहेत. तर, दहिसर ते अंधेरी (सात) या मार्गिकेवरील स्टेशनच्या दर्शनी भागांच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. १८. ६ किमी लांबीच्या या मार्गिकेवर १७ स्टेशन आहेत. पुढील वर्षभरात ही मार्गिका सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिकांच्या स्टेशन परिसरांतील कामांसाठी निविदा काढण्यास एमएमआरडीएने सुरूवात केली आहे.

या मार्गिकांच्या स्टेशनवर आवश्यक असलेल्या साईनेजेस आणि ग्राफिक्सचे डिझाईन, त्यांचे उत्पादन, आणि ते कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. या दोन मार्गिकेवरील काही स्थानके सामाईक आहेत. त्यामुळे एकूण ३० स्थानकांच्या कामांच्या पाच स्वतंत्र निविदा प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. पाच आणि सात स्थानकांची एक आणि सहा स्थानकांच्या तीन निविदा असून त्याचे एकूण अंदाजपत्रक २९ कोटी रुपये असल्याची माहिती एमएमआरडीएतल्या सुत्रांनी दिली. या वर्षाअखेरीपासून हे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत.     

टॅग्स :एमएमआरडीएमेट्रोमुंबई