लसींचे दीड लाख डोस आले, ऑक्सिजन पुरवठाही सुरळीत; मुंबई महानगरपालिका आयुक्तांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2021 06:37 IST2021-04-26T00:48:11+5:302021-04-26T06:37:14+5:30
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपत असल्याने लसीकरणाला अडथळा येत आहे. मात्र रविवारी सुमारे ...

लसींचे दीड लाख डोस आले, ऑक्सिजन पुरवठाही सुरळीत; मुंबई महानगरपालिका आयुक्तांची माहिती
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांतील लसीकरण केंद्रांवरील लसींचा साठा संपत असल्याने लसीकरणाला अडथळा येत आहे. मात्र रविवारी सुमारे दीड लाख कोविशिल्ड लसींचा साठा आला आहे. त्यामुळे सोमवारपासून सर्व लसीकरण केंद्र पुन्हा कार्यान्वित होतील, असे मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितले. तसेच ऑक्सिजन पुरवठ्याशी संबंधित सर्व समस्या मिटल्या असून, सध्या पुरवठा सुरळीत असल्याचेही ते म्हणाले.
लसीच्या दुसऱ्या डोससाठीचा कोव्हॅक्सिन लसींचा साठा मात्र ठरावीक लसीकरण केंद्रांवर मर्यादित स्वरूपात उपलब्ध असल्याचे चहल यांनी सांगितले. मुंबई व महाराष्ट्रसह संपूर्ण देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी प्राणवायू अर्थात ऑक्सिजनची गरजही वाढली आहे. मुंबई महापालिकेच्या हद्दीतील सर्व रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा साठा पुरेसा उपलब्ध राहील, विशेषतः काेराेबाधितांना प्राणवायूअभावी मिळण्यात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन अतिशय सतर्क आहे. मुंबईतील रुग्णालयांमध्ये प्राणवायूचा साठा व्यवस्थित आणि वेळेवर पोहोचत असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले.
पालिकेचे विशेष लक्ष
ऑक्सिजनचा वापर योग्यरीत्या होतो आहे, यावर मुंबई महानगरपालिका प्रशासन विशेष लक्ष ठेवून आहे. तातडीच्या प्रसंगासाठी ऑक्सिजन उत्पादकांना लगेच सूचित करून तत्परतेने प्राणवायू पोहोचविण्याची कार्यवाही केली जात असल्याचे पालिका प्रशासाने सांगितले.