Join us  

Shivsena: 'बंडखोरांनी गुवाहटीतच थांबावे, आषाढीची पूजा मुख्यमंत्रीच करतील'; मिटकरींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 5:19 PM

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले

मुंबई - शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. शिंदे आपल्यासोबत शिवसेनेच्या 40 आमदारांसह 50 आमदारांना घेऊन गेल्याने सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यावरुन राज्यात भाजप विरुद्ध शिवसेना समर्थकांमध्ये आषाढीच्या पुजेवरुन चांगलाच वाद सुरू झाल्याचे दिसून येते. अनेक भाजप समर्थकांनी विठ्ठलाची पूजा देवेंद्र फडणवीसच करतील, असे पोस्टरही झळकावले. मात्र, कोर्टाच्या निर्णयामुळे आता महाविकास आघाडीचे समर्थक खुश झाले आहेत. 

शिवसेनेनं एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी यासाठी नोटीस पाठवली, याविरोधात शिंदे यांनी सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी झाली. त्यामध्ये, 11 जुलै रोजी पुढील सुनावणी होणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. त्यामुळे, आता 10 जून रोजी असलेल्या आषाढी एकादशीची पूजा नेमकं कोण करणार? यावरुनही चर्चा घडत आहेत. बंडखोर आमदारांना न्यायालयाने 12 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे. त्यामुळे, आता 11 जुलैपर्यंत हे आमदार तिकडेच राहणार की काय, याची चर्चा होत आहे. त्यातच, आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करुन बंडखोर आमदरांवर निशाणा साधला आहे.

''अखेर पंढरीच्या पांडुरंगाची महापुजा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांच्या हस्तेच होणार हे सुप्रीम कोर्टानेही सांगितले. याचा अर्थ मविआचे मुख्यमंत्री महापुजा करतील तोवर बंडखोरांनी गुवाहाटी थांबण्यास हरकत नाही'', असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केले आहे. तसेच, "एकादशी" तिकडे आणि द्वादशी हिकडे, असेही ते म्हणाले. मिटकरी यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधत आषाढी एकादशी महाविकास आघाडीचेच मुख्यमंत्री करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले आहे. 

दरम्यान, बंडखोर आमदांवर कुठलीही कारवाई न करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. दुसरीकडे भाजपकडून सरकारविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे, अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर सरकार कोसळे की नाही हे पाहावे लागणार आहे. त्यामुळे, आषाढी एकादशीची पूजा कोण करणार? हा प्रश्न सध्यातरी अनुत्तरीतच आहे. 

विठल्लाची पुजा उद्धव ठाकरे करणार..?

एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर सरकार कोसळणार असे म्हटले जात आहे. या बंडाच्या दिवसापासून पंढरपुरात आषाढी एकादशीला विठ्ठलाची महापूजा भाजप नेते देवेंद्र फडणवीस करणार, असे म्हटले जात आहेत. सोशल मीडियावरही याचीच चर्चा होत आहे. पण, आता कोर्टाने 11 जुलैला पुढील सुनावणी ठेवली असल्याने, उद्धव ठाकरेच 10 जुलै रोजी विठ्ठलाची महापूजा करतील, असेही आता म्हटले जात आहे. पण, यात एक मोठी अडचण आहे, ती म्हणजे फ्लोअर टेस्टची. 

टॅग्स :आषाढी एकादशीउडानशिवसेनासर्वोच्च न्यायालयअमोल मिटकरी