Join us  

अरे बाप रे; एका महिन्याचे वीज बील आले ४८ हजार रुपये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2020 3:58 PM

कोरोनासोबत आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे.

मुंबई : कोरोनासोबत मुंबईकरांवर आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. वाढीव वीज बिलांनी मुंबईकरांना जोरदार शॉक दिला असतानाच दक्षिण मुंबईमधील बेस्टच्या एका वीज ग्राहकाला जुन महिन्याचे तब्बल ४८ हजार रुपये वीज बील आले आहे. वीज बिलाची ही रक्कम पाहून बेस्टच्या या ग्राहकाची पायाखालची जमीनच सरकली असून, केवळ मलाच नाही तर वीज बिलांच्या रक्कमांनी होरपळलेल्या प्रत्येक वीज ग्राहकाला न्याय मिळाला पाहिजे, असे म्हणणे सदर वीज ग्राहकाने मांडले आहे. दरम्यान, वीज ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, असे आयोगाने निर्देश दिले आहेत.मुंबई शहरात बेस्टकडून विजेचा पुरवठा केला जातो. पूर्व उपनगरात टाटा आणि अदानीकडून तर भांडूप व मुलुंडमध्ये महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. मात्र कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर राज्यभरातील वीज ग्राहकांसह मुंबईतील वीज ग्राहकांना आलेल्या वीज बिलांनी ग्राहकांचे कंबरडे मोडले आहे. दक्षिण मुंबईतील लॅमिंग्टन येथे वास्तव्यास असलेल्या अ‍ॅड. पल्लवी मराठे यांना जुन महिन्याचे वीज बील तब्बल ४८ हजार रुपये आले आहे. केवळ मराठे नाही तर येथील इमारतीमधील रहिवाशांना देखील महिन्याचे तीसएक हजार रुपये आले आहे. महत्त्वाचे म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात मराठे यांनी प्रत्येकी अडीच हजार रुपये भरले होते. जुन महिन्यातही ७ हजार भरले होते. मात्र सध्या कोरोनाच्या काळात लोकांचे रोजगार गेले आहेत. लोकांना अडचणी आहेत. आणि अशातच जर ग्राहकांना वाढीव वीज बिले पाठविली तर लोकांचे जगणे कठीण होईल. परिणामी वाढविण्यात आलेल्या दरानुसार डिसेंबरपर्यंत ग्राहकांना वीज पाठवू नका. कारण याची झळ डिसेंबरपर्यंत बसणार आहे. त्यामुळे वाढीव वीज बिलांनी वीज ग्राहकांना शॉक देऊ नका. उलटपक्षी मध्य प्रदेश सरकारने ज्या प्रमाणे वीज ग्राहकांना अनुदान देत दिलासा देण्याचा प्रयत्न केला त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेदेखील वीज ग्राहकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करावा, असे मराठे यांचे म्हणणे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहे, असे मराठे यांनी सांगितले. 

हिवाळा, लॉकडाऊन आणि उन्हाळालॉकडाऊनच्या कालावधीदरम्यान, देयके मार्च २०२० च्या आधीच्या तीन महिन्यांच्या सरासरी वीज वापराच्या आधारावर आकारण्यात आली होती. त्यावेळी हिवाळा चालू असल्यामुळे वीज वापर नेहमीच कमी असतो आणि त्यामुळे सरासरी देयके कमी रकमेची होती. आताची देयके उन्हाळ्यातील असून यावेळी वीज वापर सामान्यतः जास्त असतो आणि देयके नेहमीच जास्त रकमेची असतात. त्यामुळे मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांच्या प्रत्येक महिन्यासाठीच्या सरासरी देयक रकमेच्या समायोजनानंतर शिल्लक देय रकमेसह जास्त रकमेचे देयक आले, जे जूनमध्ये देण्यात आले आहे.

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यालॉकडाऊन अनलॉकमुंबईमहाराष्ट्रमहावितरणबेस्टटाटा