आता चित्रीकरणासाठी मिळणार भुयारी मेट्रो गाडीसह स्थानके; खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीकडून राबविले जाणार नवीन धोरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 13:23 IST2025-08-04T13:22:47+5:302025-08-04T13:23:32+5:30

अपेक्षित प्रवासीसंख्या गाठू न शकल्याने ही मार्गिका चालविण्याचा खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीने हे नवीन धोरण आणले आहे. 

Now, underground metro trains and stations will be available for filming; MMRC will implement a new policy to cover the costs | आता चित्रीकरणासाठी मिळणार भुयारी मेट्रो गाडीसह स्थानके; खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीकडून राबविले जाणार नवीन धोरण

आता चित्रीकरणासाठी मिळणार भुयारी मेट्रो गाडीसह स्थानके; खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीकडून राबविले जाणार नवीन धोरण


मुंबई : प्रवासी संख्येअभावी तोटा सहन कराव्या लागणाऱ्या आरे ते कफ परेड भुयारी मेट्रो ३ मार्गिकेवर आता उत्पन्नवाढीसाठी मेट्रो गाडी, स्थानक आणि डेपो चित्रीकरणासाठी भाड्याने दिले जाणार आहे. त्याचे धोरण मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जाहीर केले आहे. अपेक्षित प्रवासीसंख्या गाठू न शकल्याने ही मार्गिका चालविण्याचा खर्च भागविण्यासाठी एमएमआरसीने हे नवीन धोरण आणले आहे. 

मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते वरळी नाका हा २२.५ कि.मी. लांबीचा मार्ग प्रवाशांच्या सेवेत आला आहे. या मार्गावर सहा ते सात लाख प्रवासी अपेक्षित होते. मात्र सद्य:स्थितीत केवळ ६० हजार ते ७० हजार प्रवासी प्रवास करत आहेत. त्याच वेळी या मेट्रो मार्गिकेच्या उभारणीसाठी तब्बल ३७ हजार कोटी रुपयांचा खर्च आला असून तिच्या संचलनाचा खर्चही मोठा आहे. अपेक्षित प्रवासी संख्येअभावी मेट्रो संचलनाचा खर्च तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून भागविणे अवघड आहे. त्या पार्श्वभूमीवर तिकीट विक्रीव्यतिरिक्त अन्य मार्गांतून उत्पन्न मिळविण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. 

२४ तासांसाठी ९६ लाख भाडे
एखाद्या संस्थेने मेट्रो गाडी किंवा स्थानक आठ तासांसाठी भाड्याने घेतल्यास त्यासाठी प्रत्येकी ३२ लाख रुपये मोजावे लागतील. मेट्रो गाडी आणि स्थानक हे दोन्ही एकत्रित घेतल्यास ४८ लाख रुपये मोजावे लागतील; तर स्थानक अथवा डेपो किंवा मेट्रो गाडीतील २४ तासांच्या चित्रीकरणासाठी प्रत्येकी ६४ लाख रुपये एमएमआरसी आकारणार आहे. यांतील दोन्ही ठिकाणी २४ तासांच्या चित्रीकरणासाठी ती ९६ लाख रुपये आकारणार आहे.

यांना संधी मिळणार 
मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडी, स्थानके आणि डेपो हे चित्रपट, मालिका, वेब सीरिज, टीव्ही जाहिराती, डॉक्युमेंटरी आणि कॉर्पोरेट एव्ही यांच्यासाठी यांच्या चित्रीकरणासाठी देऊन त्यातून उत्पन्न मिळविण्याचा एमएमआरसीचा प्रयत्न आहे. इव्हेंट मॅनेजमेंट फर्म, कार्यक्रम आयोजक, मीडिया इन्स्टिट्यूट, मीडिया प्रॉडक्शन हाऊस, शिक्षण संस्था, विद्यार्थी चित्रपट निर्माते, शासकीय संस्था, एनजीओ, ट्रस्ट, खासगी कंपन्या, आदींना ती देण्यात येणार आहेत. 

...असे आहेत प्रती तास दर (लाखांमध्ये) 
तास            मेट्रो स्थानक     मेट्रो गाडी     स्थानक/गाडी 
१ ते ४              ५            ५        ७.५ 
५ ते ८             ३            ३         ४.५ 
९ ते २४        २            २        ३

Web Title: Now, underground metro trains and stations will be available for filming; MMRC will implement a new policy to cover the costs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.