"आता सगळा खेळ अपक्षांवर, संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2022 10:07 AM2022-05-27T10:07:50+5:302022-05-27T10:08:26+5:30

राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार नाही

Now the whole game is on independents - Ajit Pawar | "आता सगळा खेळ अपक्षांवर, संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही"

"आता सगळा खेळ अपक्षांवर, संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही"

Next

मुंबई : राज्यात राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे. शिवसेनेने दोन जागी आपले उमेदवार उतरवले आहेत, तर भाजपकडे आजघडीला २७-२८ अतिरिक्त मते आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणार नाही. मतदान होईल आणि आता सगळा खेळ अपक्षांवर आहे, असे सूचक विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी केले.

राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयातील जनता दरबारानंतर अजित पवार यांनी माध्यमांना संबोधित केले. पवार म्हणाले की, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक- एक जागा लढविणार आहे, तर शिवसेनेने दोन उमेदवार दिले आहेत. भाजपच्या दोन जागा सहज निवडून येऊ शकतात. माझा स्वत:चा अंदाज असा आहे की, निवडणुका बिनविरोध होणार नाहीत. या निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत आमदारांना आपले मत दाखवावे लागते; पण अपक्ष आमदारांना आपले मत दाखविण्याचा अधिकार नाही. 

मागे गुजरातमधील एका निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने मत दाखविल्यामुळे ते मत बाद करण्यात आले होते. जर अपक्षांनाही मत दाखवावे लागले असते किंवा किमान जे सहयोगी अपक्ष आमदार आहेत त्यांना मत दाखविण्याची मुभा असती, तर निवडणुका बिनविरोध झाल्या असत्या; पण आता सगळा खेळ अपक्ष आमदारांच्या हातात असल्याचे पवार म्हणाले. विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येणे शक्य आहे. त्यानंतरही त्यांचे स्वत:चे आणि सहयोगी अपक्ष मिळून त्यांच्याकडे हक्काची २७-२८ मते आहेत. मागच्या निवडणुकीत शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला मदत केली होती. तेव्हा आम्ही शब्द दिला होता त्यानुसार यावेळी शिवसेनेला आमचे सहकार्य राहणार आहे, असेही पवार यांनी सांगितले. 

संभाजीराजेंच्या चर्चेबाबत कल्पना नाही
संभाजीराजे छत्रपतींची काय चर्चा झाली याची मला कल्पना नाही; परंतु त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबतच भाजपचे देवेंद्र फडणवीस, अशा सर्वांसोबत चर्चा केली होती. त्यांची काय चर्चा झाली, याची मला कल्पना नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले.

Web Title: Now the whole game is on independents - Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.