आता आठवडाभर श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ; मोठा पाऊस १५ दिवस सुट्टीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2025 08:55 IST2025-07-29T08:55:43+5:302025-07-29T08:55:43+5:30
मोठा पाऊस या काळात कोसळण्याची शक्यता नाही, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज म्हणतो.

आता आठवडाभर श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ; मोठा पाऊस १५ दिवस सुट्टीवर
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीला पावसाने झोडपून काढले. पण आता हवामान बदलामुळे मोठा पाऊस मोठ्या सुटीवर जाणार आहे. वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदलामुळे मोठा पाऊस १५ ऑगस्टनंतरच बरसू शकतो, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी सोमवारी वर्तवला. कोकणासह राज्यभरातही आगामी १५ दिवसांतील पावसाची स्थिती साधारणत: अशीच असू शकते.
श्रावण महिना सुरू झाला आणि मुंबईत आषाढासारखा पाऊस कोसळू लागला. पहिले दोन दिवस थांबून थांबून का होईना पाऊस राज्याला झोडपत होता.
ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यात मात्र विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. ब्रेक घेतल्यानंतर पुन्हा पडणारा पाऊस ढगांच्या गडगडाटासह आणि विजांच्या कडकडाटात पडतो, असे हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांनी सांगितले.
आता आठवडाभर ऊन-पावसाचा खेळ
येत्या रविवारपर्यंत मुंबईत श्रावणातला ऊन-पावसाचा खेळ रंगेल. अधूनमधून श्रावणसरी येतील आणि लुप्त होती. त्यानंतर १५ ऑगस्टपर्यंत हलका, तुरळक पाऊस पडेल, असा अंदाज म्हणतो. मोठा पाऊस या काळात कोसळण्याची शक्यता नाही, असा हवामान अभ्यासकांचा अंदाज म्हणतो.