आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2025 12:04 IST2025-08-06T12:04:40+5:302025-08-06T12:04:56+5:30
मुंबईकरांकडून उपक्रमाचे स्वागत...

आता पोलिस आयुक्तांच्या भेटीसाठी परवानगीची आवश्यकता नाही; देवेन भारती नागरिकांच्या तक्रारी ऐकणार
मुंबई : आता पोलिस आयुक्तांना भेटण्यासाठी अपॉईंटमेंटची आवश्यकता नाही. कारण, दर मंगळवारी पोलिस आयुक्त देवेन भारती दुपारी साडेतीन वाजता स्वतः नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न करणार आहेत. हा उपक्रम मंगळवारपासून सुरू करण्यात आला आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिस आयुक्तांच्या अधिकृत एक्स हँडलद्वारे देण्यात आली असून, मुंबईकरांकडून या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.
पोलिस आयुक्तालयात मंगळवारी नागरिकांनी धाव घेतली. भारती यांनी स्वतः नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले. त्याचे फोटोही त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर पोस्ट केले. मंगळवारच्या आपल्या भेटीसाठी पूर्व परवानगीची आवश्यकता नाही, असे भारती यांनी नमूद केले आहे. नेटकऱ्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे. माजी आयुक्त विवेक फणसाळकर यांनी शहरातील सहआयुक्त, अतिरिक आयुक्तांना दर शनिवारी ठरावीक पोलिस ठाण्यात उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेण्याचे आदेश दिले होते. तो उपक्रम अद्यापही सुरू आहे. दुसरीकडे, तत्कालीन पोलिस आयुक्त संजय पांडे यांनीही थेट नागरिकांसोबत ऑनलाइन संपर्कात असायचे.