आता किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच वाचून दाखवली, म्हणाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2022 13:44 IST2022-02-21T13:43:41+5:302022-02-21T13:44:36+5:30
Kirit Somaiya News: कोर्लई गावातील बंगल्यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेमधून समोर आणली आहेत. त्यामुळे आता या वादाला नवे वळण लागण्याची चिन्हे आहेत.

आता किरीट सोमय्यांनी रश्मी ठाकरेंनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच वाचून दाखवली, म्हणाले
मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोर्लई गावात असलेल्या जमिनीवर असलेल्या कथित बंगल्यांवरून किरीट सोमय्या आणि शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. दरम्यान, कोर्लईतील जमिनीवर असलेले बंगले दाखवण्याचं आव्हान संजय राऊत यांनी दिलं असताना आता या बंगल्यासंदर्भात रश्मी ठाकरे यांनी कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेली पत्रेच किरीट सोमय्यांनी पत्रकार परिषदेमधून समोर आणली आहेत. त्यामुळे आता या वादाला नवे वळण लागण्याची चिन्हे आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी संजय राऊत यांनी मला पत्र लिहून भ्रष्टाचार प्रकरणी मी करत असलेल्या कामाचं कौतु केलं होतं. आता मात्र ते माझ्यावर टीका करत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या कोर्लईतील घरांचा विषय आता संजय राऊत यांनीच पुढे आणला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी मे २०१९ मध्ये कोर्लईच्या सरपंचांना पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी अन्वय मधुकर नाईक यांच्याकडून जमीन खरेदी केल्याचा उल्लेख केला होता. तसेच त्या मालमत्तेतील घरे आपल्या नावे उतरवल्याच आपली ऋणी राहीन, अशी विनंती केली होती. तसेच या पत्रावर सरपंचांकडून पत्र मिळाल्याबद्दलची सही असून, हे पत्र मी ग्रामपंचायतीबरोबरच चारही ठिकाणी आरटीआयच्या माध्यमातून मिळवलं आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.
दरम्यान, किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरेंचं अजून एक पत्र वाचून दाखवलं. कोर्लईच्या सरपंचांना लिहिलेल्या या पत्रामध्ये त्यांनी अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केलेल्या जमिनीवर कुठलेही बंगले अथवा घर नसल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणात कोण खोटं बोलतंय. तुम्ही तिथे बंगले नसल्यास सोमय्याला जोड्यांनी मारण्याचा इशारा देता. मग हे काय आहे, असा टोला किरिट सोमय्यांनी लगावला.
यावेळी किरीट सोमय्या यांनी सचिन वाझे प्रकरणावरूनही शिवसेनेवर निशाणा साधला. सचिन वाझे हा प्रामाणिक अधिकारी असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तसेच संजय राऊत हे शिवसेनेचे पहिले प्रवक्ते तर सचिन वाझे हा दुसरा प्रवक्ता असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच संजय राऊत यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे हेच आपल्याला शिविगाळ करत आहेत, असा आरोपही किरीट सोमय्या यांनी यावेळी केला.