आता ‘महा’ चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2019 05:26 AM2019-11-07T05:26:23+5:302019-11-07T05:26:29+5:30

मध्य महाराष्ट्रात तुरळक सरी; गुजरातला पावसाचा इशारा कायम

 Now the 'Great' Hurricane will turn into a low pressure area | आता ‘महा’ चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होणार

आता ‘महा’ चक्रीवादळ कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होणार

Next

मुंबई : हवामानात सातत्याने बदल होत आहेत. परिणामी, ‘महा’ चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होणार आहे. आता हे चक्रीवादळ गुरुवारी दुपारी गुजरातच्या किनारी धडकणार आहे. चक्रीवादळाचा जोर कमी होणार असल्याने त्याचा फटका गुजरातला तुलनेने कमी बसणार असला, तरीदेखील गुजरातला देण्यात आलेल्या पावसाचा इशारा कायम आहे. दुसरीकडे उत्तर कोकणासह उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस कोसळेल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी ‘महा’ चक्रीवादळ पोरबंदरपासून ३५० किलोमीटर, वेरावलपासून ३७० किलोमीटर, दिवपासून ४२० किलोमीटर अंतर दूर होते. जसजसे चक्रीवादळ पुढे सरकत आहे; तसतसे त्याचा जोर ओसरत आहे. बुधवारी सायंकाळी चक्रीवादळाचा जोर आणखी कमी झाला. गुरुवारी सकाळी चक्रीवादळाचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होण्यास सुरुवात होईल, असेही हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

येथे आज मुसळधार
भावनगर, सुरत, भरुच, आनंद आणि वडोदरासह बटोड व अहमदाबादमध्ये गुरुवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळेल, तर मध्य महाराष्ट्रातील काही तालुक्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे.
मुंबई ढगाळ राहणार
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील आकाश गुरुवार व शुक्रवारी अंशत: ढगाळ राहील. मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल.
‘बुलबुल’चा धोका
दुसरीकडे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याची शक्यता असून, या चक्रीवादळास हवामान खात्याने ‘बुलबुल’ नाव दिले आहे. सद्यस्थितीमध्ये ही हवामान प्रणाली ओरिसापासून ८२० किलोमीटर अंतरावर आहे. येत्या १२ तासांत कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतरण चक्रीवादळात होणार आहे. या चक्रीवादळाचा फटका पश्चिम बंगाल, ओरिसा तसेच बांगलादेशाला बसणार आहे.

आठ नोव्हेंबरपर्यंत परिणाम कायम राहणार
च्पूर्व-मध्य अरबी समुद्रावरील अती तीव्र चक्रीवादळाचे रूपांतर तीव्र चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ पश्चिम-मध्य व लगतच्या ईशान्य अरबी समुद्रावर आहे. ७ नोव्हेंबर रोजी पहाटे चक्रीवादळाचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होईल.
च्गुरुवारी कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. पालघर आणि ठाणे जिल्ह्यात सोसाट्याचा वारा वाहील. उत्तर महाराष्ट्र किनारपट्टीजवळ समुद्र खवळलेला राहील.
च्पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गुरुवारी सकाळपासून पुढील बारा तासांत ताशी ७० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.
च्८ नोव्हेंबरपर्यंत चक्रीवादळाचा प्रभाव कायम राहणार आहे. परिणामी, मच्छीमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे

गुरुवारी दुपारी चक्रीवादळ जेव्हा गुजरातला धडकेल, तेव्हा ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहतील. चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हवामानात सातत्याने बदल नोंदविण्यात येत आहेत. परिणामी, चक्रीवादळाचा जोर ओसरणार असला, तरी गुजरातला देण्यात आलेला पावसाचा इशारा कायम आहे.

Web Title:  Now the 'Great' Hurricane will turn into a low pressure area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.