Join us

आता ५० हजार उत्पन्न असलेल्यांनाही मिळणार निराधार योजनेचा लाभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2023 06:22 IST

उत्पन्न मर्यादा लवकरच वाढविणार

मुंबई : संजय गांधी निराधार आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक २१ हजार रुपये उत्पन्न मर्यादा आहे, ती ५० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर सादर केला जाईल, अशी माहिती विशेष साहाय्य मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेत दिली. 

काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्षवेधी मांडली होती.  निराधार महिलांना या योजनांचाच आधार आहे, याचा दाखलाही वेळेवर मिळत नाही, असा मुद्दा शिंदे यांनी मांडला.  

राष्ट्रवादीचे गटनेते जयंत पाटील यांनी, आमदार निधी देताना पैसे कमी पडत नाहीत, पण गोरगरिबांना मदत करताना पैसे कमी पडतात, असा टोला मुश्रीफ यांना लगावला. इतर सदस्यांनीही उत्पन्न मर्यादा वाढविण्याची मागणी केल्यानंतर ५० हजार रुपये उत्पन्न मर्यादा करण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर आणला जाईल, असे आश्वासन मुश्रीफ यांनी दिले. 

राज्यात आहेत ४१ लाख लाभार्थी  

या दोन्ही योजनांचे राज्यात ४१ लाख लाभार्थी आहेत. या योजनांवर सरकार साडेसात हजार कोटी खर्च करते आहे. उत्पन्न मर्यादा ५० हजार रुपयांनी वाढविली तर सरकारवर आर्थिक भार वाढेल, त्यामुळे टप्प्याटप्याने उत्पन्न मर्यादा वाढविली जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. 

टॅग्स :हसन मुश्रीफकाँग्रेसभाजपा