आता एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये टँकरने डिझेल; कारशेडचा फेरा वाचणार; मध्य रेल्वेचा यशस्वी प्रयोग
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 11:51 IST2025-09-30T11:50:22+5:302025-09-30T11:51:23+5:30
मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस इंजिनमध्ये आता टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात धाली आहे. रविवारी जसई यार्डमध्ये रेल्वेच्या वतीने यशस्वी प्रयोग करण्यात आला.

आता एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये टँकरने डिझेल; कारशेडचा फेरा वाचणार; मध्य रेल्वेचा यशस्वी प्रयोग
मुंबई: मध्य रेल्वेच्या एक्स्प्रेस इंजिनमध्ये आता टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात धाली आहे. रविवारी जसई यार्डमध्ये रेल्वेच्या वतीने यशस्वी प्रयोग करण्यात आला. या निर्णयामुळे आता रेल्वे इंजिनमध्ये डिझेल भरण्यासाठी एक्स्प्रेस गाड्यांना कारशेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ आणि इंधनाची बचत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
रेल्वेच्या इंजिनमध्ये सुमारे चार हजार लिटर इंधन भरावे लागते. एवढ्या मोठया प्रमाणात इंधन पुरवठा रेल्वे यार्ड मध्ये असलेल्या पंपाच्या माध्यमातून पारंपरिक पद्धतीने केला जात होता. ट्रेनचे इंधन संपल्यावर तिला यार्ड मध्ये नेऊन पुन्हा स्टेशनवर येण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वेळ आणि इंधन खर्ची पडत होते. त्यामुळे मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने टँकरद्वारे इंधन भरण्यास सुरुवात केली.
यापूर्वी मध्य रेल्वेच्या भुसावळ आणि नागपूर विभागामध्ये टँकरद्वारे डिझेल भरण्यास सुरुवात केली होती. आता मुंबई विभागात जसई यार्डमध्ये हा प्रयोग यशस्वी झाला असून हळू हळू सर्व ठिकाणी असे उपलब्ध करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.