Join us

‘सगेसोयरे’बाबत चार महिन्यांत अधिसूचना, निवडणुकीमुळे होऊ शकतो विलंब- मुख्यमंत्री शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2024 08:58 IST

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा कुणबी आरक्षणातील सगेसोयऱ्यांच्या व्याख्येसंदर्भात प्रसिद्ध अधिसूचनेवर ८ लाख ४७ हजार एवढ्या हरकती आणि सूचना प्राप्त झाल्या असून त्यांची छाननी सुरू आहे. आत्तापर्यंत ४ लाख ४७ हजार हरकतींची नोंद व छाननी पूर्ण झाली आहे. उर्वरित ४ लाख ४७ हजार हरकतींची नोंदणी व छाननी करण्यासाठी साधारणतः २५ ते ३० दिवसांचा कालावधी लागणार आहे. येत्या चार महिन्यांत यासंदर्भात कार्यवाही पूर्ण करण्यात येईल व अंतिम अधिसूचना जारी केली जाईल, असे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदेंनी शनिवारी सांगितले.

मंत्रिमंडळ बैठकीनंतर सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री धनंजय मुंडे, दीपक केसरकर, संजय बनसोडे यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत सामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. आतापर्यंत पावणेदोन वर्षांत सुमारे ५० ते ६० मंत्रिमंडळाच्या बैठका झाल्या आहेत.

सगेसोयरे व्याख्येसंदर्भात सामाजिक न्याय विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग या विभागांकडून हरकतींची नोंदणी व छाननी सार्वजनिक सुटीच्या दिवशीही केली जात आहे. आता हे कर्मचारीहि निवडणूक प्रक्रियेमध्ये व्यस्त असतील त्यामुळे त्यांना अवधी लागेल. अधिसूचनेचा मसुदा अंतिम करून विधी व न्याय विभागाची मान्यता घेऊन अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करू, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :एकनाथ शिंदेमराठा आरक्षण