मुंबई : प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभास गैरहजर राहिलेल्या सुमारे ४०० कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाने 'कारणे दाखवा' नोटीस बजावली आहे. हे सर्व कर्मचारी अ, ब, क आणि ड श्रेणीतील आहेत. अशा प्रकारची 'कारणे दाखवा' नोटीस प्रथमच बजावण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यांकडून उचित स्पष्टीकरण आले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे.
“२६ जानेवारी २०२५ रोजी प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तुम्हाला अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले होते. बायोमेट्रिकद्वारे आपली उपस्थिती नोंदवा, असेही सांगण्यात आले. मात्र, उपस्थितीच्या बायोमेट्रिक रेकॉर्डची पाहणी केल्यानंतर आपण गैरहजर असल्याचे समोर आले. राष्ट्रीय कर्तव्य असूनही तुम्ही या कार्यक्रमाला गैरहजर राहिला आणि ते महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) नियम, १९७९ च्या कलम ३.१ (१) (२) आणि (३) चे उल्लंघन करणारे आहे. तेव्हा तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई का करू नये? नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांत लेखी स्पष्टीकरण द्या. तुम्ही लेखी स्पष्टीकरण सादर केले नाही तर तुम्हाला ते द्यायचे नाही असे गृहीत धरून तुमच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल" असे 'कारणे दाखवा' नोटीसमध्ये म्हटले आहे.
बेशिस्तपणाला लगामविधान परिषदेच्या सभापतिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राम शिंदे यांनी राज्य विधिमंडळाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या अनेक बैठका घेतल्या आहेत. कामात बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही, तसेच नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असेही स्पष्ट केले होते.