सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 09:48 IST2025-07-30T09:46:49+5:302025-07-30T09:48:11+5:30
सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

सुशांतसिंगप्रकरणी रिया चक्रवर्तीला नोटीस; क्लोजर रिपोर्टसंदर्भात न्यायालयाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्येप्रकरणी सीबीआयने सादर केलेल्या क्लोजर रिपोर्टसंदर्भात दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री रिया चक्रवर्तीला नोटीस बजावली आहे. सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.
रिया चक्रवर्तीने सुशांतच्या दोन बहिणी प्रियांका सिंग, मितू सिंग आणि डॉ.तरुण नथुराम यांच्याविरोधात तक्रार केली होती. या तिघांनी योग्य प्रिस्क्रिप्शनशिवाय सुशांतला औषध दिल्याचा आरोप रियाने केला आहे.
सुशांतला ‘बायपोलार डिसऑर्डर’ हा मानसिक आजार असल्याचे निदान झाले होते. तो सतत उपचार घेत नव्हता. अधूनमधून औषधे घेणे थांबवायचा. तो मानसिकदृष्ट्या आजारी असूनही त्याच्या बहिणींनी मेसेजद्वारे औषधे सुचविली होती. औषधे मिळविण्यासाठी वापरलेले प्रिस्क्रिप्शन बनावट होते, असा दावा रियाने तक्रारीत केला आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी सुशांतच्या दोन्ही बहिणी आणि डॉक्टरवर भारतीय दंड संहिता (आयपीसी) आणि एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.
प्रकरणाची पार्श्वभूमी
सुशांतने १४ जून २०२० रोजी वांद्रे येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते. सुशांतच्या वडिलांनी रिया आणि तिच्या कुुटुंबीयांवर सुशांतचे आर्थिक शोषण व त्याला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाचा तपास मुंबई आणि बिहार पोलिसांकडून सीबीआयकडे वर्ग करण्यात आला व मार्च २०२५ मध्ये सीबीआयने या प्रकरणी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.