मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:46 IST2025-12-25T06:45:58+5:302025-12-25T06:46:17+5:30
Bullet Train Pollution: या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा व उपयोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्तास मोठा फटका बसणार आहे.

मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाने प्रदूषणाच्या नियमांचे पालन न केल्याने आणि आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी न केल्याने पालिकेच्या एच पूर्व विभागाकडून प्रकल्पाला काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे. या प्रकल्पात आवश्यक त्या सुधारणा व उपयोजनांची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काम बंद राहणार आहे. त्यामुळे बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामास तूर्तास मोठा फटका बसणार आहे.
मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळल्याप्रकरणी न्यायालयाकडूनही पालिकेवर सातत्याने ताशेरे ओढण्यात आले. बुधवारी पालिकेने केलेल्या तपासणीत बुलेट ट्रेनच्या बीकेसीतील स्थानकाच्या कामादरम्यान तसेच वांद्र्यातील उच्च न्यायालय संकुलासाठीच्या पाडकामादरम्यान प्रदुषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत पुन्हा आढळले.
...तरीही सुधारणा नाहीच
बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामादरम्यान एनएचएसआरसीएलकडून वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन होत असल्याची बाब पालिकेच्या तपासणीत निदर्शनास आली. त्यानंतर पालिकेकडून कारणे दाखवा नोटीस बजवावी होती. मात्र या नोटिशीनंतरही प्रकल्पात वायू प्रदूषण नियंत्रणांच्या दृष्टीने आवश्यक त्या सुधारणा न झाल्याने बीकेसीतील वायू प्रदूषणास, हवेची गुणवत्ता ढासळण्यास हा प्रकल्प जबाबदार ठरत असल्याचे समोर आले. उच्च न्यायालयानेही नाराजी व्यक्त करत पालिकेवर ताशेरे ओढत आवश्यक ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
४ प्रकल्पांना नोटीस
पालिकेने ४ प्रकल्पांना काम थांबवा, तर ६ प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस बजावली. मेट्रो २ बी च्या कामाला नोटीस कायम असून एमएमआरडीएकडून आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याची हमी देण्यात आली.