Notice of tax evasion of Rs. 5 crores came to the notice of valuation | मोलकरणीला आली १० कोटींचा कर थकविल्याची नोटीस
मोलकरणीला आली १० कोटींचा कर थकविल्याची नोटीस

मुंबई : घरकाम करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करणाऱ्या एका मोलकरणीला १० कोटी रुपयांचा कर थकविल्याचा पत्र आल्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली, पण केलेल्या चौकशीत, मालकाच्या कार्यालयात काम करत असताना, तेथे आलेल्या व्यावसायिकाने महिलेच्या अशिक्षितपाणाचा फायदा घेत तिची कागदपत्रे घेतली. पुढे याच कागदपत्रांच्या आधारे बनावट कंपनी उघडून कोट्यवधींचे व्यवहार केल्यामुळे कर थकविल्याचे पत्र तिला मिळाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार, तिने पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून लोकमान्य टिळक मार्ग पोलीस अधिक तपास करत आहे.

डोंबिवलीच्या रहिवासी असलेल्या तारुलता शाह (५५) असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे. पतीच्या निधनानंतर चार मुलांची जबाबदारी तारुलता यांच्या खांद्यावर पडली. अशात विविध कार्यालये आणि घरांमध्ये घरकाम करत त्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करतात. डोंबिवलीत एका सीएकडे सफाईचे काम करत असताना २००६ मध्ये त्यांची ओळख मशीद बंदर येथील नरशी नाथा रोडवर राहत असलेल्या पंकज बोरा (५५) सोबत झाली. बोराने त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा घेत ओळख वाढविली.
शाह यांना व्यवसायासाठी मदत करत त्यांचे बँकेत खाते उघडून देण्याचे आमिष दाखविले. त्या जाळ्यात आल्याचे समजताच त्यांच्या घरी जात त्यांच्या रेशन कार्डसह, इतर महत्त्वाची कागदपत्रे घेतली. त्याच कागदपत्रांच्या आधारे मे. जेमल इंटरप्रायजेसच्या नावाने झवेरी बाजार येथील एका बँकेच्या शाखेत खाते उघडले. त्यानंतर, मे क्रिएटिव्ह इंटरप्रायजेस नावाने डोंबिवलीत दुसरे बनावट खाते उघडून, २००७ ते २०१७ दरम्यान कोट्यवधींची व्यवहार केले. त्यांच्या सह्यांचा वापर करून तो चेकने ते पैसे काढत होता.

आणखी लोकांना फसवले
माझ्या अशिक्षितपणाचा फायदा घेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल केली. त्याने माझ्यासारख्या अनेकांना अशाच प्रकारे गंडा घातला आहे. पोलिसांवरच विश्वास असून, त्यांनी आरोपीला लवकरात लवकर पकडून योग्य ती कारवाई करावी.
-तारुलता शाह, तक्रारदार.

२०१७ मध्ये आली आयकर विभागाची नोटीस
२०१७ मध्ये त्यांना आयकर विभागाची नोटीस आली. यात, २०१० -११ मध्ये ४ कोटी १० लाख ७४ हजार तर २०११-१२ मध्ये ६ कोटी १ लाख ५४ हजार रुपयांचा कर चुकविल्याचे नमूद करण्यात आले होते. या पत्रातील रक्कम ऐकताच त्यांनाच धक्का बसला. एकीकडे दोन वेळच्या खाण्याची भ्रांत असताना, एवढ्या रकमेचा कर कसा आला? याबाबत त्यांनी अधिक चौकशी सुरू केली. तेव्हा बोराने हा प्रताप केल्याचे समोर येताच शाह यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत अधिक तपास सुरू केला आहे.

Web Title: Notice of tax evasion of Rs. 5 crores came to the notice of valuation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.