बेड रिकामे, रुग्ण वेटिंगवर; मुंबईतील बड्या रुग्णालयांना नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 06:23 AM2020-06-03T06:23:14+5:302020-06-03T06:35:38+5:30

आरोग्यमंत्री; जसलोक, हिंदुजा, लीलावती, बॉम्बे हॉस्पिटलचा समावेश

Notice to major hospitals in Mumbai | बेड रिकामे, रुग्ण वेटिंगवर; मुंबईतील बड्या रुग्णालयांना नोटीस

बेड रिकामे, रुग्ण वेटिंगवर; मुंबईतील बड्या रुग्णालयांना नोटीस

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्य शासनाने कोरोना उपचारासाठी केलेल्या नियमांचे पालन न करण्यात आल्याने डॉ. सुधाकर शिंदे यांनी बॉम्बे हॉस्पिटल, जसलोक, हिंदुजा, लिलावती या हॉस्पिटल्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन न करणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिला.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. त्यांच्या सोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.


रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहीती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी दिला. भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने डॉ. शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावलीे.
सुरूवातीला त्यांनी बॉम्बे हॉस्पिटलला भेट दिली. तिथे खाटांच्या उपलब्धतेबाबत जाहीर फलक नव्हते. रुग्णालयातील एकूण खाटा, ८० टक्केनुसार दिलेल्या खाटा, शिल्लक खाटा यांची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर जसलोक, हिंदुजा, लिलावती या रुग्णालयांनाही भेटी देऊन तेथील पाहाणी केली.


रात्री दहाच्या सुमारास सुरू झालेली ही मोहीम पहाटे दोनपर्यंत सुरू होती. रुग्णांना खाटा नाकारू नका. त्यांना वेळेवर उपचार द्या. शासनाला सहकार्य करा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

खाटा असूनही रुग्ण प्रतीक्षेत
काही रुग्णालयांमध्ये खाटांच्या उपलब्धतेबाबत आणि दिलेल्या खाटांबाबत माहिती दर्शविणारे फलक नव्हते, शासनाने उपाचारासाठी जे दर निश्चित केले आहेत ते दरपत्रक लावण्यात आलेले नव्हते. क्षमतेच्या ५० टक्के खाटांचा वापर न करताही अनेक रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे, अशा विविध बाबी आरोग्यमंत्र्यांनी रुग्णालयांना दिलेल्या भेटीदरम्यान निदर्शनास आल्या.

Web Title: Notice to major hospitals in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.