ठाणे-बोरीवली बोगद्याच्या आरसी प्लांटवरून नोटीस; एमपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 12:35 IST2024-12-18T12:34:54+5:302024-12-18T12:35:07+5:30
आरएमसी प्लांट सध्या जेथे ठेवला आहे, येथून योग्य ठिकाणी स्थालांतरित करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.

ठाणे-बोरीवली बोगद्याच्या आरसी प्लांटवरून नोटीस; एमपीसीबीला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : संजय गांधी नॅशनल पार्कच्या खालून बोरिवली-ठाणे या दुहेरी भूमिगत बोगद्यासाठी लागणारे रेडी मिक्स सिमेंट (आरएमसी) प्लांट स्थलांतरित करण्याच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने मंगळवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (एमपीसीबी), मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) यांना नोटीस बजावली आणि त्यांना प्रतिज्ञापत्रे सादर करण्याचे निर्देश दिले. आरएमसी प्लांट सध्या जेथे ठेवला आहे, येथून योग्य ठिकाणी स्थालांतरित करावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.
ठाणे विकास आराखड्यानुसार, या ठिकाणी रहिवासी क्षेत्र, पालिकेची प्राथमिक शाळा उभारण्याचा हेतू होता. प्लांटसाठी इएसझेड देखभाल समितीची परवानगीही घेण्यात आलेली नाही, असे याचिकादार रोहित जोशी यांनी याचिकेत म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
कासारवडली भागातील हावरे सिटी येथील आरएमसी प्लांट अद्याप सुरु आहे. त्यामुळे येथील रहिवासी रोहित जोशी यांनी गेल्या आठवड्यात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर मंगळवारी सुनावणी झाली. या प्लांटच्या बाजूलाच १५ ते २० हजार रहिवाशांचे वास्तव्य आहे. शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वयानुसार हा प्लांट ग्रीन झोनमधून ऑरेंज झोनमध्ये हलविण्यात आला. ऑरेंज झोनमध्ये प्लांट लोकवस्ती, शाळा, महाविद्यालयांपासून ५०० मीटर दूर असावा, असे नमूद केले आहे. परंतु त्या नियमांची पायमल्ली केल्याचा दावा जोशी यांनी केला.