मास्टर सभा नव्हे, लाफ्टर सभा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला; एका झटक्यात संपूर्ण यादीच वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2022 20:18 IST2022-05-15T20:16:09+5:302022-05-15T20:18:53+5:30
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री ठाकरेंवर सडकून टीका

मास्टर सभा नव्हे, लाफ्टर सभा; फडणवीसांचा ठाकरेंना टोला; एका झटक्यात संपूर्ण यादीच वाचली
मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल काहीतरी तेजस्वी, ओजस्वी ऐकायला मिळेल, अशी आशा होती. काल मास्टर सभा होणार होती. पण केवळ लाफ्टर सभा पाहायला मिळाली, असा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. ते गोरेगावमधील सभेत बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर टीका करत असताना सरकारवर तोफ डागली. कोविड काळात घोटाळा झाला नाही का, यांचा मंत्री तुरुंगात गेला की नाही, कोरोना काळात मजुरांना मुंबई सोडावी लागली नाही का, यशवंत जाधव यांची संपत्ती वाढली नाही का, दाऊदशी व्यवहार करणारा तुमचा मंत्री जेलमध्ये गेला की नाही, कोरोना काळात दीड लाख लोकांचा मृत्यू झाला नाही का, अशी प्रश्नांची सरबत्तीच फडणवीसांनी केली.
आपला लेक मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसा पठण करणं राजद्रोह असेल आणि औरंगजेबच्या कबरीवर जाऊन माथा टेकणं राजशिष्टाचार असेल याची कल्पनादेखील बाळासाहेबांनी कधी केली नसेल. हैदराबादचा ओवेसी औरंगाबादमध्ये येतो आणि औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकवतो. हा गुन्हा नाही का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला. अरे काहीतरी शरम करा, अशा शब्दांत फडणवीसांनी ठाकरेंना लक्ष्य केलं.