इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 06:07 IST2025-12-06T06:05:27+5:302025-12-06T06:07:13+5:30
मनस्ताप : प्रवाशांचे हाल, विमानतळांचे झाले बसस्टॅंड, इतर कंपन्यांकडून प्रवाशांची लूट. उपाय : नवी नियमावली डीजीसीएने घेतली मागे, बोजवाऱ्याची उच्चस्तरीय चौकशी करणार

इंडिगो नव्हे, इंडि-नो-गो! दिवसभरात १ हजार उड्डाणे, ३ दिवसांत २ हजारांपेक्षा जास्त विमानसेवा रद्द
मुंबई : इंडिगो कंपनीच्या विमानांचा घोळ सलग तिसऱ्या दिवशी कायम असून शुक्रवारी देशभरातील एकूण एक हजार विमान सेवा रद्द झाल्या आहेत. गेल्या तीन दिवसांत मिळून २ हजारांपेक्षा जास्त विमान सेवा रद्द झाल्याचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सोसावा लागला आहे.
आपली विमान सेवा १० ते १५ डिसेंबर दरम्यान पूर्ववत होईल, असा दावा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी केला आहे. इंडिगोच्या या घोळाची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाची सखोल चौकशी समिती करणार आहे.
इंडिगोची सेवा कोलमडल्यामुळे देशातील जवळपास सर्वच विमानतळांवर मोठ्या प्रमाणावर प्रवाशांची गर्दी आहे. त्यात इंडिगो कंपनी ज्या गेटवरून विमान उडणार आहे त्यात सातत्याने बदल करत आहे. त्यामुळे प्रवाशांना आपल्या विमानाची नेमकी स्थिती काय आहे याची कोणतीही माहिती मिळत नाही.
इंडिगोतर्फे घोळ आणखी वाढत जाताना दिसत आहे. काही ग्राहकांना स्वतःहून तुमचे विमान रद्द झाल्याचे कंपनीतर्फे कळवले जात आहे. त्याच प्रवाशांना पुन्हा तुमचे विमान कोणत्या वेळेला उड्डाण करेल, याबाबत माहिती देणारे मेसेज केले जात आहेत. त्यामुळे घोळ वाढताना दिसत आहे.
२,३०० विमान उड्डाणे इंडिगो कंपनीतर्फे दिवसाकाठी देशात आणि परदेशात केली जातात. त्यातील एक हजार विमान उड्डाणे एकाच दिवसात रद्द झाली.
पुढे काय?
शुक्रवारप्रमाणे शनिवारी देखील कंपनीची एक हजारांपेक्षा जास्त विमाने रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कारण काय?
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठी जे नवीन वेळापत्रक १ नोव्हेंबरपासून लागू केले होते. त्याची अंमलबजावणी फसल्यामुळे कंपनीची सेवा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली आहे.
उपाय काय?
प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी डीजीसीएने वैमानिक आणि केबिन कर्मचाऱ्यांसाठीचे नवीन वेळापत्रक रद्द केले आहे.
इंडिगोचे बुकिंग सुरूच?
धक्कादायक गोष्ट म्हणजे, मात्र एकिकडे घोळ सुरू असतानाही कंपनी नवीन ग्राहकांच्या प्रवाशांचे बुकिंग घेत असल्याचा दावा प्रवाशांनी केला आहे.
इंडिगोचा ओटीपी ८.५ टक्क्यांपर्यंत घसरला
इंडिगोचा ऑन-टाइम परफॉर्मन्स (ओटीपी) गुरुवारी ८.५ टक्क्यांपर्यंत खाली गेला. तर बुधवारी याचे प्रमाण १९.७ टक्के तर मंगळवारी ३५ टक्के होते.
इंडिगोची दिलगिरी तिकिटाचे पूर्ण पैसे परत करणार
विमान उड्डाणे रद्द होणे आणि विलंबाने संचालन होणे याबाबत समाज माध्यमांवर दिलगिरी व्यक्त करून इंडिगोने रद्द केलेल्या तिकिटांची पूर्ण रक्कम मूळ पेमेंट पद्धतीवर परत केली जाईल, अशी घोषणा केली. तसेच ५ ते १५ डिसेंबरदरम्यान बुकिंग रद्द करण्यात आलेल्या आणि प्रवासात बदल केलेल्या विनंत्यांवर संपूर्ण शुल्कमाफी देण्यात येईल असेही कंपनीने म्हटले.
दिवसभरात किती विमाने रद्द?
दिल्ली -२२०
मुंबई - १२०
हैदराबाद - ७५
बंगळुरू - ७०
याशिवाय अन्य विमानतळांवरूनही मोठ्या प्रमाणावर इंडिगोची विमाने रद्द झाली. ३.८० लाख प्रवाशांना इंडिगो कंपनीची विमाने दर दिवशी सेवा देतात.
इंडिगोची विमानसेवा तीन दिवसांत सुरळीत होण्याची केंद्र सरकारला आशा
नवीन फ्लाइट ड्यूटी नियम तात्पुरते स्थगित ठेवणे, तसेच अन्य उपायांमुळे इंडिगो विमान कंपनीची हवाई वाहतूक पुढील तीन दिवसांत सुरळीत होण्याची अपेक्षा आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे मंत्री के. राममोहन नायडू यांनी शुक्रवारी सांगितले.
हवाई वाहतुकीत निर्माण झालेल्या अडथळे व त्यामुळे उद्भवलेली स्थिती यांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने चार सदस्यीय समिती स्थापन केली आहे.
समितीमध्ये संयुक्त संचालक जनरल संजय ब्राह्मणे, उपसंचालक जनरल अमित गुप्ता, वरिष्ठ फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक कॅप्टन कपिल मांगलिक आणि फ्लाइट ऑपरेशन्स निरीक्षक कॅप्टन रामपाल यांचा समावेश आहे. या समितीने आपला अहवाल १५ दिवसांत सादर करावा असे आदेश देण्यात आले आहेत.