नॉट ‘बेस्ट’ ! प्रवासी १२ लाखांनी घटले; नियोजनाअभावी उपक्रमाची दुर्दशा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 12:51 IST2025-08-07T12:49:54+5:302025-08-07T12:51:46+5:30
१० वर्षांतील वास्तव, स्वत:च्या मालकीच्या उरल्या केवळ २५० बस

नॉट ‘बेस्ट’ ! प्रवासी १२ लाखांनी घटले; नियोजनाअभावी उपक्रमाची दुर्दशा
मुंबई : सुरक्षित आणि स्वस्तात प्रवास म्हणून ‘बेस्ट’कडे पाहिले जाते. मात्र, प्रवासीबेस्ट बसकडे पाठ फिरवत आहेत. २०१३-१४ ते २०२२-२३ या १० वर्षांत प्रवासीसंख्या ३४ लाखांवरून थेट २२ लाखांवर घसरली आहे. दुसरीकडे स्वत:च्या मालकीच्या केवळ २५० बस उरल्या आहेत. कंत्राटी तत्त्वावरील बस, कर्मचारी, तसेच घोटाळे, यामुळे बेस्टची सार्वजनिक वाहतूक अशी ओळख लवकरच पुसली जाणार आहे, अशी टीका काँग्रेसच्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली.
‘बेस्ट’चा गुरुवारी स्थापना दिवस असून, त्या पार्श्वभूमीवर म्हात्रे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उपक्रमातील विविध त्रुटींवर बोट ठेवले. ‘बेस्ट’ दिवसेंदिवस डबघाईला येत आहे. आधुनिकीकरणाच्या नावाखाली चालवलेला गोंधळ थांबवावा आदी मागण्या त्यांनी यावेळी केल्या.
२०१९ पासून बस खरेदी बंद
२०१९ पासून कंत्राटदारांच्या बस चालवताना उपक्रम आणि बेस्ट कर्मचारी संघटनेचा करार झाला होता. तेव्हा स्वमालकीच्या ३,३३७ बस ठेवणे निश्चित केले होते. मात्र, ‘बेस्ट’ने २०१९पासून स्वमालकीच्या बस खरेदी करणे बंद केले. त्यामुळे स्वत:चा ताफा कमी झाला.
मागण्या काय ?
बेस्टच्या सर्व करारांची तातडीने चौकशी करावी.
भाडेतत्त्वावर आधारित बेस्टच्या आर्थिक गुंतवणुकीचे सार्वजनिक लेखा परीक्षण करावे.
सुरक्षितता व पुरवठा या अटींचे उल्लंघन करणाऱ्या कंत्राटदारांवर कठोर कारवाई करावी.
खासगीकरण मागे घेऊन स्वत:च्या बसचा ताफा वाढवावा.
बेस्टच्या आगारांची सार्वजनिक जमीन सुरक्षित ठेवावी.
‘बेस्ट’ ही मुंबईकरांची दुसरी लाइफलाइन आहे. खासगीकरण आणि घोटाळे, यातून ‘बेस्ट’ वाचवणे आवश्यक आहे. सरकारने तत्काळ याची दाखल घेत योग्य कार्यवाही करावी.
शीतल म्हात्रे, माजी नगरसेविका, काँग्रेस
प्रत्यक्षात ६६५ बसचा पुरवठा
कंत्राटदारांनीदेखील त्यांना सांगितलेल्या बस वेळेत पुरवल्या नाहीत. १२ महिन्यांत कंत्राटदारांनी २,१०० बसचा पुरवणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात ६६५ बसचा पुरवठा केला आहे. त्यातच ‘बेस्ट’ने आणखी २,४०० बसचे कंत्राट दिल्याची माहिती म्हात्रे यांनी दिली.