नॉट ‘बेस्ट’, पूल पडला अन् महसूल घटला; प्रभादेवी पूल पाडकामाचा फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 11:20 IST2025-10-20T11:19:50+5:302025-10-20T11:20:24+5:30
एमएमआरडीएने भरपाई द्यावी; माजी नगरसेवकाची मागणी

नॉट ‘बेस्ट’, पूल पडला अन् महसूल घटला; प्रभादेवी पूल पाडकामाचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : वरळी - शिवडी उन्नत मार्गासाठी प्रभादेवी पूल पाडण्यात येणार असून, बेस्ट उपक्रमातील काही बसमार्ग खंडित करण्यात आले आहेत. हे बसमार्ग खंडित केल्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेतच, पण बेस्टचे महसुली उत्पन्नही घटले आहे. त्यामुळे एमएमआरडीएने बेस्टला आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवकाने केली आहे.
गणेशोत्सवानंतर प्रभादेवीचा (एलफिन्स्टनचा) पूल हा वाहतुकीसाठी पूर्णतः बंद झाला आहे. त्यातच या पुलाच्या कामामुळे अनेक बसमार्ग खंडित करण्यात आले आहेत तर अनेक मार्ग वळवावे लागले आहेत. प्रभादेवी पश्चिमेकडून परळ-शिवडीकडे येणारे बस क्र. ए-१६२, १६८ व २०१ हे मार्ग प्रभादेवीपर्यंतच सुरू आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. या प्रकरणी शिवडीतील माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाला पत्र लिहिले आहे.
तीनही मार्गांवरील बसना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद
तीनही मार्गावरील बेस्ट बसना प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यामुळे बेस्ट प्रशासनास चांगला महसूल मिळत होता. या मार्गावर एकूण १७ बसगाड्या दररोज चालतात व एकंदर २०९ फेऱ्या सकाळी ५:३० ते रात्री ११ पर्यंत होत असत व एकूण १३ हजार प्रवासी प्रवास करतात.
प्रवाशांची गैरसोय
प्रभादेवी पूल पाडकामासाठी मार्ग बंद केल्याने दादर व प्रभादेवी स्टेशनहून येणाऱ्या प्रवाशांना बेस्ट बस पकडण्यासाठी धावपळ करावी लागत असून गैरसोय होते.
‘वेळापत्रकाचे नियोजन करावे’
प्रवाशांच्या सोयीसाठी दादर पश्चिमेहून जाणाऱ्या बस क्र. ५२, ८८, ११०, ए३५७, २०१, ए६३, सी ३०५ या बसेसना वीर कोतवाल उद्यानजवळ जाता येईल, अशा रितीने वेळापत्रकाची आखणी करावी व प्रवाशांच्या सोयीसाठी बस क्र. ४० ची वारंवारता मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात यावी व त्या वेळेवर सोडण्यात याव्यात, जेणेकरुन अँटोनिया डिसिल्वा, शारदाश्रम हायस्कूल व प्रभादेवीला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर होईल, अशी मागणी पडवळ यांनी बेस्ट प्रशासनाकडे केली आहे.
‘बेस्ट’ या आर्थिक तुटीमुळे अजूनच संकटात जाण्याची शक्यता अधिक
हे बस मार्ग बंद केल्यामुळे बेस्ट प्रशासनाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणार आहे. अगोदरच डबघाईला आलेले बेस्ट प्रशासन या आर्थिक तुटीमुळे अजूनच संकटात जाण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे बाधित होणारे निवासी, अनिवासी गाळेधारक, मंदिर, मशीद आदींच्या पुनर्निर्माणाकरिता एमएमआरडीए प्रशासनाने ठोस आर्थिक स्वरूपात भरपाई केली आहे. त्याच धर्तीवर बेस्ट प्रशासनास ठोस आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी नगरसेवक पडवळ यांनी केली आहे.