Join us  

कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही; धनंजय मुंडेंचा मुख्यमंत्र्यांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 9:39 AM

विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करतो. भ्रष्ट मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढली. मी काढलेली प्रकरणं खोटी नाही.

मुंबई - सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्यासाठी आक्रमक पद्धतीने मी सभागृहात प्रश्न मांडतो त्यामुळे कुठेतरी माझ्यावर दबाव यावा यासाठी खोटे गुन्हे, आरोप लावले जातात. मात्र मी कोणत्याही दबावाला भीक घालणार नाही असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला आहे. 

यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, विरोधी पक्षनेता म्हणून सरकारच्या धोरणांवर टीका करतो. भ्रष्ट मंत्र्यांची प्रकरणे बाहेर काढली. मी काढलेली प्रकरणं खोटी नाही. प्रकाश मेहता, दिलीप कांबळे यांची प्रकरणे बाहेर काढली. लोकायुक्तांनी प्रकाश मेहतांवर आणि हायकोर्टाने दिलीप कांबळे यांच्यावर ठपका ठेवला आहे असं त्यांनी सांगितले. 

तसेच खोटेनाटे आरोप करण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी माझ्यावरील सर्व प्रकरणांची चौकशी करावी आणि जे भ्रष्ट मंत्री आहेत त्यांची चौकशी आम्ही करतो. जे सत्य आहे ते लोकांसमोर यावं असं आव्हान मी मुख्यमंत्र्यांना देतो असं धनंजय मुंडे यांनी सांगितले. 

कमकुवत भाजपाला शक्तिशाली बनविण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांची गरज केंद्रात आणि राज्यात सत्तेत असताना भाजपाच्या नेतृत्वाला कुठेतरी आपला पक्ष कमकुवत असल्याची जाणीव असल्याने इतर पक्षातील नेत्यांना भाजपात प्रवेश देऊन त्यांना मंत्रिपद द्यायची आणि पक्षाला शक्तिशाली बनवायचं आहे असा टोलाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी भाजपाला लगावला आहे. 

दरम्यान बीडमधील राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांच्या शिवसेना प्रवेशावर बोलताना मुंडे म्हणाले की, क्षीरसागर यांना राष्ट्रवादी काँग्रेस सोडायची होती. पक्ष सोडण्यासाठी काहीतरी निमित्त लागतं ते निमित्त मला बनविण्यात आलं. जयदत्त क्षीरसागर यांच्यासाठी मी नेता नव्हतो तर ते आमच्यासाठी नेते होते असं त्यांनी सांगितले.  

अधिवेशनात शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन आक्रमक होत दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना अनुदान, पशुधन सांभाळण्यासाठी राज्य सरकार कमी पडतंय तसेच ज्या 16 मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागले आहेत. त्यांच्याविरोधात चौकशी करण्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. त्या प्रकरणांचे काय झाले याबाबत सभागृहात सरकारला धारेवर धरणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितले.  

टॅग्स :धनंजय मुंडेमुख्यमंत्री