Join us

'सरकारचा एकही प्रतिनिधी मनोज जरांगे पाटलांना भेटायला आला नाही,' रोहित पवारांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 14:32 IST

'गेंड्याच्या कातडीचे सरकार; निवडणुका असताना मनोज जरांगेंना भेटायला 10-10 मंत्री यायचे'

Rohit Pawar on Maratha Morcha : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पाच दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषण करत आहेत. राज्यभरातील मराठा आंदोलक मोठ्या संख्येने जरांगेंना पाठींबा देण्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. अशातच, आज (दि. 2 सप्टेंबर) दुपारपर्यंत मुंबई रिकामी करा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले असून, मुंबई पोलिसांनीही जरांगे पाटलांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस(शप) गटाचे आमदार रोहित पवारांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

निवडणुका होत्या तर 10-10 मंत्री यायचे आणि आता...

रोहित पवारांनी एक्सवर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले की, 'मराठा आंदोलनाचा आज पाचवा दिवस असूनही आंदोलकांशी संवाद साधण्यास चर्चा करण्यास सरकारकडून एकही प्रतिनिधी येत नसेल किंवा तोडगा काढण्याचा प्रयत्न होत नसेल तर सरकारची ही भूमिका योग्य आहे का? गेल्या वेळेस निवडणुका होत्या तर 10-10 मंत्री यायचे आणि आता मात्र आंदोलकांना वाऱ्यावर सोडताय? एकीकडे आंदोलकांशी चर्चा करायची नाही आणि दुसरीकडे मात्र जाणूनबुजून आंदोलन बदनाम करून आंदोलनाची सहानुभूती कमी करण्यासाठी कटकारस्थाने रचायची, नेरेटिव्ह सेट करायचा हे सरकारमधील काही नेत्यांना शोभते का?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

गेंड्याच्या कातडीचे सरकार 

रोहित पवार पुढे म्हणतात,  'युवा आंदोलकांना विनंती आहे की, चुकुनही चूक करू नका. हे गेंड्याच्या कातडीचे सरकार केवळ संधी शोधत आहे. सर्वांनी शांतता ठेवत नियम पाळायलाच हवेत. सरकारनेही केवळ बघ्याची भूमिका न घेता चर्चा करत तत्काळ तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. मुख्यमंत्री गणपती दर्शनात व्यस्त आहेत, एक उपमुख्यमंत्री गावाला जाऊन बसलेत तर दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांचा पत्ताच नाही. एवढा संवेदनशील प्रश्न असताना हे सरकार अजूनही झोपेचं सोंग का घेत आहे?' असे म्हणत त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

टॅग्स :मनोज जरांगे-पाटीलरोहित पवारमराठा आरक्षणमुंबई