कोकणवासीयांसाठी दादर 'पॅसेंजर' नाहीच! दिवा स्थानकातून सुविधा; प्रशासनाचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 13:11 IST2026-03-27T13:10:03+5:302026-03-27T13:11:00+5:30

कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन दिवा स्थानकातून सुरू राहणार आहे. दादरवरून ही ट्रेन पुन्हा सुरू होणार नाही

not a dadar passenger for konkanvasi residents facilities from diva station administration clarifies | कोकणवासीयांसाठी दादर 'पॅसेंजर' नाहीच! दिवा स्थानकातून सुविधा; प्रशासनाचे स्पष्टीकरण

कोकणवासीयांसाठी दादर 'पॅसेंजर' नाहीच! दिवा स्थानकातून सुविधा; प्रशासनाचे स्पष्टीकरण

लोकमत न्यूज नेटवर्क,  मुंबई : कोकणातील प्रवाशांसाठी महत्त्वाची असलेली दादर रत्नागिरी पॅसेंजर ट्रेन आता दिवा स्थानकातून सुरू राहणार आहे. दादरवरून ही ट्रेन पुन्हा सुरू होणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. 

परिणामी, सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारी पॅसेंजर ट्रेन पकडण्यासाठी दिवा स्टेशन गाठावे लागणार आहे. कोरोनानंतर २०२१ मध्ये 'झीरो टाइमटेबल' अंतर्गत ही ट्रेन दादरऐवजी दिवावरून सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला.

रेल्वे प्रशासनाच्या निर्णयामुळे सण-उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा हिरमोड

सहा रूळांचे क्रॉसिंग

ही गाडी दिवा स्टेशनच्या उपनगरी मार्गावरून मुख्य मार्गावर जाताना सहा रूळांचे क्रॉसिंग करावे लागत होते.

परिणामी साधारणतः सात ते आठ लोकल थांबवाव्या लागत होत्या.

लोकलच्या वेळापत्रकावर विपरीत परिणाम होत असल्याने ही ट्रेन दिवा स्थानकावरून चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर उपनगरी लोकल आणि मेल / एक्स्प्रेस ट्रेनची संख्या वाढवण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कोकण मार्गावर दररोज ४६ सुविधा

मध्य रेल्वेने २०२२नंतर एकूण ३३ नवीन मेल /एक्स्प्रेस ट्रेन सुरू केल्या असून, सुरू असलेली एकही एक्स्प्रेस रद्द केली नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबई - कोकण रेल्वे मार्गावर सध्या दररोज ४६ ट्रेन उपलब्ध आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लोकमान्य टिळक टर्मिनस, दादर, कल्याण आणि दिवा स्थानकांवरून सुटणाऱ्या ट्रेनचा समावेश आहे. याशिवाय, सणासुदीच्या काळात विशेष गाड्याही चालवल्या जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रवासी संघटनेचा आक्षेप

अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी रेल्वे प्रशासनाच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. पॅसेंजर ट्रनेचे नऊ थांबे रद्द केले असून, वक्तशीरपणा सुधारल्याचा दावा चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रवाशांची गैरसोय होत असल्याने रेल्वेने निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली.
 

Web Title: not a dadar passenger for konkanvasi residents facilities from diva station administration clarifies