Non-communicable diseases like blood pressure, cancer, diabetes increased by 8% over last year | रक्तदाब, कर्करोग, मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढ
रक्तदाब, कर्करोग, मधुमेहासारख्या असंसर्गजन्य आजारांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढ

मुंबई : संसर्गजन्य रोगांपेक्षा देशात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढल्याचे नॅशनल हेल्थ प्रोफाइलच्या अहवालातून समोर आले आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या या अहवालानुसार, मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग या आजारांत गेल्या वर्षीच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१७ आणि २०१८ या दोन वर्षांमध्ये बदलत्या जीवनशैलीमुळे या आजारांचे प्रमाण अधिक वाढल्याचे अधोरेखित करण्यात आले आहे.

गेल्या दोन वर्षांत कर्करोगामध्ये तिपटीने वाढ झाल्याचे धक्कादायक वास्तव या अहवालात मांडले आहे. कर्करोगाच्या वाढीमागे बदलती जीवनशैली आणि उशिराने होणारे निदान ही दोन प्रमुख कारणे आहेत. २०१८ साली ६५ दशलक्ष रुग्णांनी असंसर्गजन्य आजाराविषय आरोग्य केंद्रांना भेट दिली. त्यातील १ लाख ६० हजार रुग्णांना सर्व्हायकल कर्करोग, स्तन कर्करोग आणि मुखाच्या कर्करोगाचे निदान होऊन उपचार करण्यात आले. २०१९च्या नॅशनल हेल्थ प्रोफाइलच्या अहवालानुसार, या आजारांत ३२४ टक्क्यांनी वाढ झाल्याने वैद्यकीय विश्वात चिंता व्यक्त करण्यात येत आहे. या अहवालानुसार, राज्यात अडीच लाख रुग्णांची असंसर्गजन्य आजारांविषयक तपासणी केली, त्यात उच्च रक्तदाबाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.
केंद्रीय आरोग्य यंत्रणेने या अहवालात कर्करोग वाढल्याचे कारण पोषक आहाराचा अभाव, तंबाखू आणि मद्यसेवन असे स्पष्ट केले आहे. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात कर्करोगाचा दर विकसित जगाच्या तुलनेत कमी आहे. कर्करोगाच्या या वाढत्या प्रमाणामागे कर्करोगाचे अचूक निदान, उशिरा निदान आणि कर्करोगतज्ज्ञ, आॅन्कोलॉजिस्ट यांची संख्या देशात कमी असल्याची समस्या आहे. परिणामी, यामुळे देशातील अनेक कर्करोग रुग्णांचे निदानही होत नसल्याचे म्हटले आहे. या अहवालानुसार, शासकीय दवाखाना, आरोग्य केंद्र आणि रुग्णालय यांना प्राधान्य देण्याचे प्रमाण वाढले, ही सकारात्मक बाब आहे. यात ४९.७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे म्हटले आहे.

‘परस्पर सहकार्याने काम करण्याची गरज’
कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुमेधा शाह यांनी सांगितले की, देशातील कर्करोगाचे प्रमाण वाढणे, हे चिंताजनक आहे. मात्र, शासकीय आरोग्य यंत्रणांनी कर्करोगाचे उपचार, तपासण्या याविषयी योजना आणि तळागाळात पोहोचण्याला प्राधान्य दिले पाहिजे. याशिवाय, शासकीय आणि खासगी यंत्रणांनीही सहकार्याने काम केल्यास कर्करोगाचा वाढत चाललेला विळखा कमी करण्यास मदत होईल.

Web Title: Non-communicable diseases like blood pressure, cancer, diabetes increased by 8% over last year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.