Join us

१५ जूनपासून शाळा नको; पालकांसह तज्ज्ञांचे मत; ऑनलाइनचा अट्टाहास चुकीचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 06:29 IST

अनेक शाळा, महाविद्यालये शासनाने क्वारंटाइनसाठी ताब्यात घेतल्या आहेत.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट लक्षात घेता १५ जूनपासून शाळा सुरू करणे सयुक्तिक होणार नाही. शाळा सुरू करण्याची घाई शासनाने करू नये, अशी भूमिका पालक आणि शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांची आहे. तसेच आॅनलाइनचा खर्च अनेक पालकांना परवडणारा नसल्याने हा अट्टाहास चुकीचा असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

शिक्षण विकास मंच या शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांच्या फेसबुक समूहावर सदस्य व शिक्षक असलेल्या जयवंत कुलकर्णी यांनी शाळा सुरू करण्याबाबत घेतलेल्या मतदान सर्वेक्षणात राज्यातील सदस्यांपैकी ३५० हून अधिक जणांनाी शाळा १५ जूनपासून सुरू करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्याचे म्हटले आहे. ७७ जणांनी शाळा सुरू करणे योग्य असल्याचे म्हटले. वयोगटानुसार व इयत्तांनुसार शाळा सुरू करण्याचा विचार व्हायला हवा, असे मत काहींनी नोंदवले.

अनेक शाळा, महाविद्यालये शासनाने क्वारंटाइनसाठी ताब्यात घेतल्या आहेत. त्या कधी रिकाम्या होणार, त्यांचे निर्जंतुकीकरण कधी करणार, असे प्रश्न आहेत. शिक्षकांना मे महिन्याच्या सुट्टीतही कोरोनाचे काम करावे लागले. आॅनलाइन शाळा सुरू करून शिक्षकांवर कामाचे ओझे लादले जाईल, असे मत शिक्षक लोकशाही आघाडीचे उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी व्यक्त केले. आर्थिक अडचणीत सापडलेल्या पालकांना ई लर्निंगसाठी आवश्यक स्मार्टफोन, लॅपटॉप यांचा खर्च परवडणारा नसल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :शाळामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस