"साक्षीदारांनी त्यांना मारताना पाहिलंय"; महापौर रितू तावडेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाने फेटाळला अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:15 IST2026-03-18T17:15:05+5:302026-03-18T17:15:05+5:30

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत वाढ; ८ वर्ष जुन्या प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निकाल

No Relief for Mayor Ritu Tawde Mumbai Court Orders Trial to Proceed in 8 Year Old School Assault Case | "साक्षीदारांनी त्यांना मारताना पाहिलंय"; महापौर रितू तावडेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाने फेटाळला अर्ज

"साक्षीदारांनी त्यांना मारताना पाहिलंय"; महापौर रितू तावडेंच्या अडचणीत वाढ; कोर्टाने फेटाळला अर्ज

Mayor Ritu Tawde Teacher Assault Case: मुंबईच्या राजकारणात सध्या सत्ताधारी भाजप-शिंदे गटाच्या महापौररितू तावडे यांच्या कामाची मोठी चर्चा आहे. मात्र, एकीकडे प्रशासकीय निर्णयांवरून चर्चेत असलेल्या महापौर तावडे आता एका जुन्या गुन्ह्यामुळे कायदेशीर कचाट्यात सापडल्या आहेत. २०१६ मधील शिक्षक मारहाण प्रकरणातून स्वतःची सुटका करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न फसला असून, सत्र न्यायालयाने त्यांचा दोषमुक्ती अर्ज फेटाळून लावला आहे.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण २९ जुलै २०१६ चे आहे. वाकोला येथील एका महानगरपालिका उर्दू शाळेत एका महिला शिक्षिकेच्या बदलीवरून मोठा वाद झाला होता. संबंधित शिक्षिका कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत असताना त्यांची बदली करण्यात आली होती. या मुद्द्यावरून तत्कालीन भाजप नगरसेविका रितू तावडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत जाऊन व्यवस्थापनाशी हुज्जत घातली होती. आरोपानुसार, या वादादरम्यान तावडे यांनी मोहम्मद याकुब रहिद आणि नदीम अहमद शेख या दोन शिक्षकांच्या कानशिलात लगावली होती. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाचे गंभीर निरीक्षण

महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणात तथ्य नसल्याचा दावा करत स्वतःला दोषमुक्त करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती. मात्र, अतिरिक्त सत्र न्यायाधीश वाई. पी. मनाठकर यांनी हा अर्ज फेटाळताना कडक शब्दांत ताशेरे ओढले. "पीडित शिक्षक आणि इतर प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी रितू तावडे यांना घटनास्थळी मारहाण करताना स्पष्टपणे पाहिले आहे. शाळेसारख्या पवित्र ठिकाणी, जिथे मुले संस्कार शिकतात, तिथे झालेली ही हिंसा गंभीर आहे. पुराव्यांवरून प्रथमदर्शनी तावडे यांचा सहभाग सिद्ध होत असल्याने त्यांना या टप्प्यावर दोषमुक्त करता येणार नाही," असे न्यायालयाने म्हटले.

महापौरपदाला धोका आहे का?

न्यायालयाच्या या निर्णयामुळे रितू तावडे यांना आता नियमित खटल्याला सामोरे जावे लागणार आहे. मात्र, तांत्रिकदृष्ट्या त्यांचे महापौरपद सध्या सुरक्षित आहे. मुंबई महानगरपालिका कायदा १८८८ नुसार, जोपर्यंत एखाद्या लोकप्रतिनिधीला नैतिक अधःपतनाच्या गुन्ह्यात ६ महिन्यांपेक्षा जास्त कारावासाची शिक्षा होत नाही, तोपर्यंत त्यांना अपात्र ठरवता येत नाही. सध्या हे प्रकरण केवळ सुनावणीच्या टप्प्यावर असून, तावडे यांना अद्याप दोषी ठरवण्यात आलेले नाही.

Web Title : महापौर रितु तावड़े को झटका, कोर्ट ने डिस्चार्ज याचिका खारिज की।

Web Summary : महापौर रितु तावड़े की 2016 के शिक्षक मारपीट मामले को खारिज करने की कोशिश नाकाम रही। अदालत ने चश्मदीद गवाहों के बयानों का हवाला दिया, स्कूल में हिंसा को गंभीर बताया। मुकदमे का सामना करते हुए, उनकी महापौर पद तकनीकी रूप से सुरक्षित है, जब तक कि दोषी ठहराया और छह महीने से अधिक की सजा नहीं हो जाती।

Web Title : Mayor Ritu Tawde faces setback as court rejects discharge plea.

Web Summary : Mayor Ritu Tawde's attempt to dismiss a 2016 teacher assault case failed. The court cited eyewitness testimony, highlighting the violence in a school setting. While facing trial, her mayoral position remains technically secure unless convicted and sentenced to over six months.