Join us  

पुनर्विकास नाही, तोवर मत नाही; बीडीडी चाळीत लागले बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 2:58 PM

मुंबईत गेली अनेक वर्ष रखडलेला प्रश्न म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास. कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडलेला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सगळेच पक्ष जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मुंबईतही प्रचाराला रंगत आली आहे. मुंबईत गेली अनेक वर्ष रखडलेला प्रश्न म्हणजे बीडीडी चाळींचा पुनर्विकास. कित्येक वर्ष हा प्रकल्प रखडलेला असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात बीडीडी चाळींचा समावेश होतो. या मतदारसंघात गेली ५ वर्ष शिवसेनेचे खासदार लोकप्रतिनिधित्व करत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीसाठीही शिवसेना-भाजपा महायुतीकडून विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र अरविंद सावंत यांना बीडीडी चाळीतल्या नागरिकांनी विरोध केला. 

बीडीडीचा चाळीचा पुनर्विकास रखडल्याने स्थानिक नागरिकांच्या रोषाला विद्यमान खासदार अरविंद सावंत यांना सामोरं जावं लागलं. डिलाईल रोडवर शिवसेना-भाजपा महायुतीचे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार अरविंद सावंत यांची प्रचार रॅली काढण्यात आली होती. या रॅलीच्या विरोधात स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. परिसरात ठिकठिकाणी आधी बीडीडी चाळींचा पुनर्विकास, मगच मतदान अशाप्रकारे जाहीर निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत.  

गेली ५ वर्ष खासदार हरविलेले होते, आमचे प्रश्न प्रलंबित राहिलेत असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाची फाईल म्हाडाकडे रखडलेली आहे. अद्याप हा प्रकल्प रखडलेला असताना आम्ही यांना मतदान का करायचा असा प्रश्न स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून निषेधाचे फलक लावण्यात आले आहेत. पाच वर्ष प्रश्न प्रलंबितच आहेत. बीडीडी पुर्नविकास हा पूर्णपणे अपयशी ठरलेला आहे. स्थानिक आमदार, खासदार टोलवाटोलवीचे उत्तर देतं आहेत. पाच वर्षात खासदार अरविंद सावंत यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचं स्थानिक नागरिक सांगत आहेत.  

गुरुवारी ना.म जोशी मार्गावरील बीडीडी चाळींमध्ये युतीचे उमेदवार अरविंद सावंत यांची प्रचार रॅली होती. मात्र स्थानिकांनी त्यांच्या प्रचार रॅलीला विरोध करत खासदारांना प्रवेश नाकारल्याचा व्हिडीओ सोशल मिडीयात व्हायरल होतोय. पुर्नविकासाच्या करारावर स्वाक्षरी होत नाही. तोपर्यंत मतदान नाही असा आक्रमक पवित्रा बीडीडीच्या रहिवाशांनी घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीडीडी चाळींचा पुनर्विकास करणं हे आव्हान शिवसेना आणि काँग्रेसच्या उमेदवारांसमोर असणार हे निश्चित. 

टॅग्स :लोकसभा निवडणूकमुंबई दक्षिणअरविंद सावंतशिवसेनाभाजपाकाँग्रेसमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019