No proof, no complaint of 1.5 crore bribe! However, the suspension of the officer | दीड कोटीच्या लाचेचे ना पुरावे, ना तक्रार! तरीही झाले अधिकाऱ्याचे निलंबन

दीड कोटीच्या लाचेचे ना पुरावे, ना तक्रार! तरीही झाले अधिकाऱ्याचे निलंबन

- यदु जोशी
मुंबई : गेली चार वर्षे ज्या प्रकरणात एकही तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे झालेली नाही, तरी सामाजिक न्याय विभागातील एका वरिष्ठ अधिका-यास निलंबित करण्याची घोषणा झाल्याने अधिका-यांमध्ये असंतोष पसरला आहे. या निलंबनाचा आदेश काढू नयेत, अशी मागणी आता राजपत्रित अधिकारी संघटनेने केली आहे.

अकोला येथील विभागीय जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे तत्कालिन संशोधन अधिकारी किशोर भोयर यांना निलंबित करण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत केली होती. मेहकर, जि.बुलडाणा येथील शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे प्रकरण काही वर्षांपासून सुरू आहे. रायमूलकर हे अनुसूचित जातींसाठी राखीव मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत. त्याच रायमूलकर यांनी गेल्या आठवड्यात विधानसभेत असा आरोप केला की किशोर भोयर यांनी आपल्याकडे दीड कोटी रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. हवे ते जात प्रमाणपत्र देण्यासाठी त्यांनी ही लाच मागितल्याचा त्यांचा आरोप होता. आमदाराला लाच मागणाºया अधिकाºयास तत्काळ निलंबित करा, अशी मागणी झाल्यानंतर उपमुख्यमंत्री पवार यांनी भोयर यांच्या निलंबनाची घोषणा केली होती.

एखाद्या लोकसेवकाने लाच मागितल्यानंतर त्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करावी लागते मग विभागाकडून कारवाई केली जाते. या प्रकरणात अशी कोणतीही तक्रार करण्यात आलेली नव्हती. रायमूलकर यांच्या जात पडताळणी प्रकरणाचा पडताळणी समितीने अभ्यास करून अनुसूचित जातीचे असल्याचा त्यांचा दावा अवैध ठरविला होता. त्या समितीत भोयर हेदेखील होते. त्याच रागातून रायमूलकर यांनी दीड कोटी रुपयांच्या लाचेचे आरोप केले. भोयर यांच्यावर निलंबनाची केलेली कारवाई ही एकतर्फी आहे. त्यामुळे विभागातील अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होत आहे. शासनाने नीट चौकशी करून पुढील कार्यवाही करावी, अशी मागणी राजपत्रित अधिकारी संघटनेचे (सामाजिक न्याय विभाग) अध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठविलेल्या पत्रात केली आहे.

अजित पवार काय भूमिका घेणार?
अजित पवार यांनी किशोर भोयर यांच्या निलंबनाची तर घोषणा केली पण ज्या आरोपांवरून हे निलंबन झाले त्याचे ना लेखी पुरावे आहेत ना चार वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात कुठे तक्रार झाली. अशावेळी आता अजित पवार काय भूमिका घेणार या बाबत उत्सुकता आहे.

दीड कोटींची लाच मी कधीही मागितली नाही. या प्रकरणी शासनाने कोणत्याही स्तरावर चौकशी करावी मी त्यासाठी तयार आहे. - किशोर भोयर

मी या लाचप्रकरणाची तक्रार केलेली नव्हती हे खरे आहे पण माझे कार्यकर्ते भोयर यांच्याकडे गेले तेव्हा त्यांनी दीड कोटींची लाच मागितली होती. - आ. संजय रायमूलकर

Web Title: No proof, no complaint of 1.5 crore bribe! However, the suspension of the officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.