Join us

"नारायण राणेंसाठीच अमित शाहांनी उद्धव ठाकरेंना कॉल केलेला"; राऊतांनी फोडला नवा बॉम्ब

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 10:43 IST

नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.

Sanjay Raut On Narayan Rane: दिशा सालियान मृत्यू प्रकरणात पुन्हा आदित्य ठाकरे यांचे नाव आल्याने सत्ताधाऱ्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. दुसरीकडे राणे पिता-पुत्रांकडून आदित्य ठाकरेंचा यात सहभाग असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहेत. अशातच माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला. या प्रकरणात आदित्य ठाकरेंचे नाव घेऊ नका असं सांगण्यासाठी उद्धव ठाकरेंनी फोन केल्याचे नारायण राणेंनी म्हटलं. मात्र आता नारायण राणेंना उद्धव ठाकरेंनी कोणताही फोन केला नसल्याचे स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं. नारायण राणेंना अटक झाली होती तेव्हा त्यांच्या घरच्यांनी उद्धव ठाकरेंना फोन केले होते असंही संजय राऊत म्हणाले.

दिशा सालियन प्रकरणात सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी याचिका दाखल केली आहे. अशातच नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला होता. आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंचा फोन आल्याचा दावा नारायण राणेंनी केला. उद्धव ठाकरेंनी दोन वेळा फोन केल्याचे नारायण राणेंनी म्हटलं. त्यानंतर खासदार संजय राऊत यांनी असं काही घडलं नसल्याचे म्हटलं आहे.

"माझी या विषयावर उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा झाली. असं काही घडल्याच्या गोष्टीला उद्धव ठाकरेंनी पूर्णपणे नकार दिला आहे. यासंदर्भात असा कोणताही फोन नारायण राणे यांना झालेला नाही आणि असे संभाषण झालेले नाही. मिलिंद नार्वेकर यांच्याशी माझं बोलणं झालं. ते म्हणाले मी कधी कोणाला फोन लावून दिला नाही. नारायण राणे यांनी ज्यांचा उल्लेख केला त्यांनीच सांगितलं की अशा प्रकारचे कोणतेही संभाषण झाले नाही. नारायण राणे कशाच्या आधारावर अशी वक्तव्यं करत आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. त्यांची प्रकृती बरी नाहीये का? त्यासाठी थोडंसं पाहावं लागेल. त्यांनी सत्तरी पार केली आहे आणि आम्हाला त्यांच्या प्रकृतीची चिंता वाटते. पण उद्धव ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की अशा प्रकारचे कोणतेही प्रकारचे संभाषण फोनवर झालेल नाही,"  असं संजय राऊतांनी स्पष्ट केलं.

"नारायण राणे यांना जेव्हा अटक केली तेव्हा त्यांच्यासाठी त्यांच्या कुटुंबातून उद्धव ठाकरेंना फोन आले होते की जरा त्यांना सांभाळून घ्या, त्यांची प्रकृती बरी नाही. त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरेंनी पोलिसांना सूचना देऊन त्यांना सोडायला सांगितलं. त्यांच्यासाठी केंद्रातून फोन आले. त्यासंदर्भात अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला होता ते आमचे केंद्रीय मंत्री आहेत त्यांना सांभाळून घ्या. आता या गोष्टी काढायच्या असतात का. पण तुम्ही काढल्यामुळे हे आम्हाला सांगावं लागत आहे. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे," असंही संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :संजय राऊतनारायण राणे उद्धव ठाकरे